आयुष्याचा जोडीदार निवडण्याची सेवा पुरवणाऱ्या Bharat Matrimony या संकेतस्थळाची एक जाहिरात सध्या चर्चेचा आणि काही प्रमाणात वादाचा विषय ठरली आहे. होळीच्या निमित्ताने भारत मॅट्रिमोनीकडून एक जाहीरात सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. या जाहिरातीवर काही नेटिझन्सनी तीव्र आक्षेप घेतला आहे. जाहिरातीवर येणाऱ्या संतप्त प्रतिक्रियांवरून #BoycottBharatMatromony असा हॅशटॅगच ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला होता.
काय घडलं नेमकं?
भारत मॅट्रिमोनीकडून गुरुवारी धुलिवंदनाच्या निमित्ताने एक जाहिरात शेअर करण्यात आली होती. यामध्ये धुलिवंदन सणाचा संदर्भ घेत कौटुंबिक हिंसाचारासंदर्भात एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यातून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडून त्यापासून समाजाला परावृत्त करण्याचा हेतू असल्याचं सांगितलं जात असलं, तरी त्यासाठी धुलिवंदनाचा संदर्भ घेतल्यामुळे नेटिझन्स नाराज झाले आहेत.
काय आहे जाहिरातीमध्ये?
य जाहिरातीमध्ये एक महिला चेहऱ्यावर वेगवेगळे रंग लावून स्क्रीनवर येते. जेव्हा ती तिचा चेहरा पाण्याने धुवून स्वच्छ करते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा दिसू लागतात. यानंतर व्हिडीओवर आवाहनपर संदेश दिसू लागतो.यामध्ये “काही रंग सहजासहजी पूर्णपणे धुतले जात नाहीत. होळीदरम्यान झालेल्या शोषणाचे गंभीर मानसिक परिणाम होतात. आज असा मानसिक आघात सहन करणाऱ्या महिलांपैकी एक तृतीयांश महिलांनी होळी खेळणं सोडून दिलं आहे”, असं या जाहिरातीमध्ये म्हटलं आहे.
“या महिला दिनी होळी खेळण्याच्या अशा पद्धतीचा स्वीकार करुयात, जी महिलांसाठी सुरक्षित आणि समावेशक ठरेल”, असं आवाहनही या जाहिरातीमध्ये करण्यात आलं आहे.
नेटिझन्सची नाराजी
दरम्यान, या जाहिरातीवर काही नेटिझन्सनी तीव्र आक्षेप घेतला आहे. “तुम्ही फार विचित्र आहात. होळी या हिंदू सणाचा संदर्भ घेऊन असा संदेश देण्याची हिंमत कशी केली? होळीचा कौटुंबिक हिंसाचाराशी काय संबंध आहे? तुमचं डोकं फिरलंय का? तुम्हाला नक्कीच हिंदू ग्राहक नको आहेत. तुमच्या संकेतस्थळावर काय घडतंय, याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे”, असं एका युजरनं ट्वीट केलं आहे.
याव्यतिरिक्त काही नेटिझन्सनी पाठिंबा देणारे ट्वीटही केले आहेत. “खरंतर भारत मॅट्रिमोनीच्या हिंमतीला दाद द्ययाला हवी. सण-उत्सव हे अशा मानसिक आघातांचा अनुभव देणारे असूच नयेत. महिलांचा अपमान करणाऱ्या, त्यांना मारहाण करणाऱ्या पुरुषांना असा संदेश देण्यासाठी महिला दिनापेक्षा अजून कुठला चांगला दिवस असू शकतो?” असं ट्वीट एका युजरनं केलं आहे.
या जाहिरातीवरून सध्या चर्चा चालू झाली असून काही नेटिझन्स जाहिरातीला तीव्र विरोध करत असताना काही पाठराखण करताना दिसत आहेत.