एका लग्न सोहळ्यासाठी गेलेल्या ३५ जणांनी लग्नातला आनंद तर लुटला. पण परत येताना मात्र त्यांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. या ३५ जणांना पोलिसांनी रस्त्यावरच बेडूक उड्या मारण्याची शिक्षा दिली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

करोना प्रतिबंधासाठीचे नियम मोडल्याने पोलिसांनी या ३५ जणांना ही शिक्षा दिली आहे. या ३५ जणांमध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. हे सर्वजण एका लग्नाला गेले होते. तिकडून परतत असताना त्यांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग अशा कुठल्याही नियमाचं पालन केलं नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ही शिक्षा दिली. या व्हिडिओमध्ये हे सर्वजण बेडूक उड्या मारताना दिसत आहेत. तर शेजारी पोलीस काठी घेऊन उभे राहिलेले दिसत आहेत.

हा व्हिडिओ मध्य प्रदेशातल्या भिंड परिसरातला आहे. हे ३५जण एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसून परतत होते. ते एकमेकांच्या निकटच्या संपर्कात होते आणि त्यांनी मास्कही परिधान केला नव्हता. या भागाचे डीएसपी मोतिलाल कुशवाह यांनी हे पाहून ट्रॅक्टर थांबवला आणि त्यांना शिक्षा दिली.

भिंड पोलीस सध्या मोठ्या लग्नांमध्ये जाऊन कारवाई करत आहेत. राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने गर्दी असलेल्या ठिकाणी कारवाई केली जात आहे. पोलीसांनी नियम मोडणाऱ्या अनेकांविरोधात एफआयआरही दाखल केली आहे.