बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट सोमवारी रात्री हॅक करण्यात आलं होतं. यानंतर काही तासातच हायक अदनाम सामी यांचंही ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. अय्यिलदिज टीम सायबर आर्मीने दोन्ही ट्विटर अकाऊंट हॅक केल्याची जबाबदारी स्विकारली होती. या ग्रुपबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात

अय्यिलदिज टीम सायबर आर्मीची ओळख काय ?
अय्यिलदिज टीम हा पाकिस्तानी समर्थक टर्की येथील ग्रुप आहे. २००२ मध्ये त्याची स्थापना झाली. याआधी एक अकाऊंट हॅक केलं असता त्यांनी मेसेज लिहिला होता की, टर्कीला सायबर हल्ल्यांपासून रोखणं तसंच दहशतवादी संघटनांशी लढा देणं आपला मुख्य हेतू आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या ग्रुपमधील सदस्य स्वत:चा उल्लेख हॅक्टिव्हिस्ट (hacktivists) असा करतात. आभासी जगात आपण एक अॅक्टिव्हिस्ट म्हणून काम करतो असा त्यांचा दावा आहे.

या ग्रुपची मोडस ऑपरेंडी काय आहे ? यामधून त्यांना काय मिळतं ?
हे ग्रुप शक्यतो अशा अकाऊंट्सना टार्गेट करतात ज्यामधून आपला संदेश पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळू शकते. उदाहरणार्थ, अमिताभ बच्चन यांचं ट्विट अकाऊंट हॅक करुन तुर्कीमधील फुटबॉलपटूंना अयोग्य वागणूक मिळत असल्याचा संदेश लिहिण्यात आला होता. काही प्रकरणांमध्ये, हा ग्रुप अशा लोकांना टार्गेट करतो जो त्यांच्या मते चुकीच्या गोष्टींमध्ये सहभागी आहे. म्हणूनच त्यांनी अदनान सामीला टार्गेट केलं. अदनान सामी याने पाकिस्तानला दगा दिला आहे असं त्यांचं म्हणणं असून यामुळेच त्यांनी त्याचं अकाऊंट हॅक केलं होतं. अदनान सामी याने भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी पाकिस्तानी नागरिकत्व सोडलं असून भारतातच स्थायिक झाला आहे.

या ग्रुपने याआधी कोणत्या भारतीयांचं अकाऊंट हॅक केलं आहे का ?
अय्यिलदिज टीम सायबर आर्मीने याआधी भाजपा खासदार स्वपन दासगुप्ता, अभिनेते अनुपम खेर, भाजपा राष्ट्रीय महासचिव राम माधव यांचं अकाऊंट हॅक केल्याची जबाबदारी स्विकारली होती. या ग्रुपने अभिनेता शाहीद कपूरचं सोशल मीडिया अकाऊंटही हॅक केलं होतं. पद्मावत चित्रपटात अल्लाऊद्दीन खिलजीला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं असल्याचं सांगत त्यांनी शाहीदवर टीका केली होती. यावेळी त्यांनी अभिनेत्री कतरिना कैफचा फोटो टाकत ‘I love you, Katrina Kaif’ असं लिहिलं होतं.

कशा पद्दतीने करतात अकाऊंट हॅक ?
हा ग्रुप कशा पद्धतीने सोशल मीडिया अकाऊंट्समध्ये घुसखोरी करतं हे अद्याप आम्ही शोधत आहोत अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. याआधी या ग्रुपने अभिनेता अनुपम खेर यांना आधीच हॅक करण्यात आलेल्या स्वपन दास गुप्ता यांच्या अकाऊंटवरुन DM (डायरेक्ट मेसेज) पाठवून त्यांचं अकाऊंट हॅक केलं होतं. अनुपम खेर यांनी DM वर क्लिक करताच त्यांचंही अकाऊंट हॅक झालं.

पोलीस सध्या अमिताभ बच्चन किंवा अदनान सामी यांना अशाच एखाद्या पुशिंग लिंकवर क्लिक केलं होतं का याचा शोध घेत आहेत. पुशिंग लिंकमध्ये व्हायरस असतो जो क्लिक केल्यावर अॅक्टिव्हेट होतो आणि पासवर्डसारखी संवेदनशील माहिती हॅकर्सच्या हाती लागते.