VIDEO: भारतामध्ये राहतं १८१ सदस्य असणारं ‘जगातील सर्वात मोठं कुटुंब’

३९ पत्नी, ९४ मुलं, १४ सूना आणि ३३ नातवंडं एकाच घरात राहतात

झियोना चाना यांचे कुटुंब
मिझोरमची राजधानी ऐझॉल येथे जगातील सर्वात मोठे कुटुंब राहते. झियोना चाना हे या कुटुंबाचे प्रमुख आहेत. या कुटुंबात सध्या १८१ सदस्य आहेत.

झियोना चाना यांच्या कुटुंबाला अनेकांनी एका साबणाच्या जाहिरातीत आधीही पाहिलं असेल. त्यांना एकूण ३९ पत्नी, ९४ मुलं, १४ सूना आणि ३३ नातवंडं आहेत. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला ना? पण हे खरं आहे. झियोना आपल्या ३९ पत्नींसोबत चार मजल्यांच्या एका मोठ्या घरात राहतात. या घराला १०० हून अधिक खोल्या आहेत.

आता तुम्ही म्हणाल इथे कुटुंबात इनमिन पाच माणसं जरी असली तरी आपल्याला गुण्यागोविंदाने राहता येत नाही किंवा चौकोनी कुटुंबाचा माहिना सरताना भागत नाही तेथे हे कुटुंब एकत्र कसं राहतं. मात्र चाना हे आपल्या ३९ पत्नींसोबत सुखाने संसार करत आहेत. झिओन यांच्या पत्नींपैकी वयाने मोठी असलेली एक कुटुंबातील इतर महिलांमध्ये भांडणं तर होणार नाही ना, याची पुरेपूर काळजी घेते. तिच या प्रत्येकीला घरची कामं आणि जबाबदाऱ्या वाटून देते. झिओन यांनी कुटुंबासाठी काही नियम ठरवून दिलेत. घरातील प्रत्येक सदस्य या नियमांचे पालन करतात. म्हणून इतकी वर्षे हे कुटुंब एकत्र नांदते आहे.

झिओन आता ७१ वर्षांचे झालेत. ते अशा पंथातले आहेत जिथे पुरूषाला बहुपत्नीत्वाचा अधिकार आहे. त्यानुसारच त्यांनी ३९ लग्न केली आहेत. म्हणूच १८१ सदस्य असलेलं हे कुटुंब भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठं कुटुंब ठरलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Biggest family in the world with 181 members lives in mizoram