Bihar Hospital Shocking Viral Video : बिहारमधील बेगुसराय येथील एक भयंकर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, पाय मोडलेल्या एका रुग्णाला प्लास्टरऐवजी डॉक्टरांची असे काही उपचार केले की पाहून तुम्हालाही धडकी भरेल. ही घटना मंजौल रुग्णालयात घडल्याचे वृत्त आहे. या व्हिडिओनंतर लोक रुग्णालयाच्या कारभारावर आणि बिहारमधील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाचा रस्ते अपघात झाला. त्याच्या पायाला दुखापत झाली आणि तो फ्रॅक्चर झाला. अपघातानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी मंझौल रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टर योग्य तपासणी करून पायाला प्लास्टर घालतील, अशी अपेक्षा कुटुंबीयांना होती; मात्र रुग्णालयात जे घडले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

प्लास्टरऐवजी बांधला पुठ्ठा

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रुग्ण रुग्णालयाच्या बेडवर वेदनेने विव्हळताना दिसत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, डॉक्टरांनी किंवा कर्मचाऱ्यांनी त्याच्या मोडलेल्या पायाला स्थिर ठेवण्यासाठी आणि आधार देण्यासाठी एका पुठ्ठ्याच्या खोक्याचा (Cardboard Box) वापर केला. तो पुठ्ठा कापून पायाभोवती कापडची बँडेजने बांधण्यात आला आहे.

सोशल मीडियावर तीव्र संताप

‘द बिहार’ नावाच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता, जो काही वेळात प्रचंड व्हायरल झाला. हा प्रकार पाहून नेटकऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. जर एखादे सरकारी रुग्णालय रुग्णाला साधे प्लास्टरसुद्धा उपलब्ध करून देऊ शकत नसेल, तर तिथे येणाऱ्या इतर रुग्णांचे काय हाल होत असतील, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अनेक युजर्सनी याला आरोग्य विभागाचा आणि रुग्णालय प्रशासनाचा अत्यंत गंभीर निष्काळजीपणा म्हटले आहे.

चौकशीची मागणी

रुग्णालयात प्लास्टरचे साहित्य उपलब्ध नव्हते की कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला, याबद्दल आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या घटनेमुळे बिहारमधील सरकारी आरोग्य व्यवस्थेचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.