बिहारचे डीजीपी अर्थात पोलीस महासंचालक संदीप कुमार सिंघल यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे जीवितहानी झाल्याचा प्रकार समोर आला होता. या पार्श्वभूमीवर दारूचं सेवन आणि दारूबंदी या गोष्टी बिहारमध्ये ऐरणीवर आलेल्या असतानाच बिहारच्या पोलीस महासंचालकांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. २६ नोव्हेंबर अर्थात शुक्रवारचा हा व्हिडीओ असून त्यामध्ये पोलीस महासंचालक इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शपथ देत असल्याचं दिसून येत आहे.

एएनआयनं हा व्हिडीओ ट्वीट केला असून व्हिडिओच्या सुरुवातीलाच बिहारचे पोलीस महासंचालक संदीप कुमार सिंघल हात पुढे करून शपथ घेण्याच्या पवित्र्यात उभे असल्याचं दिसत आहे. बिहार पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यानचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये संदीप कुमार सिंघल यांच्यासमोर अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी देखील आहेत. या सर्वांना पोलीस महासंचालकांनी दारूसंदर्भातली शपथ दिली आहे.

काय आहे शपथ?

पोलीस महासंचालकांनी दारूसेवन आणि दारूबंदीबाबतच्या मुद्द्यांचा शपथेमध्ये समावेश केला आहे. “मी आज इथे २६-११-२०२१ रोजी पोलीस मुख्यालयाच्या अंगणात सत्यनिष्ठेने शपथ घेतो की मी आयुष्यभर दारूचं सेवन करणार नाही. मी कर्तव्यावर उपस्थित असेन किंवा नसेन, पण माझ्या दैनंदिन आयुष्यात देखील दारूशी संबंधित गोष्टींमध्ये सहभागी होणार नाही. दारूबंदीला लागू करण्यासाठी जी काही कायदेशीर कारवाई निश्चित आहे, ती करेन. दारूशी संबंधित कोणत्याही गोष्टीत मी सहभागी असेन, तर नियमानुसार जी कारवाई असेल, तिला सामोरा जाईन”, असं पोलीस महासंचालक म्हणत असताना त्यापाठोपाठ उपस्थित सर्व कर्मचारी आणि पदाधिकारी म्हणत आहेत.

सेवानिष्ठा, समाजाप्रती बांधिलकी वगैरे मुद्दे आजपर्यंत शपथ घेताना बोलल्याचं ऐकिवात असेल. पण पहिल्यांदाच पोलिसांना देण्यात येत असलेल्या शपथेमध्ये दारू पिणार नाही, दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करेन या मुद्द्यांचा समावेश करण्यात आल्यामुळे त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी यामुळे दारूबंदी होईल का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

तर काहींनी बिहारमध्ये दारूबंदी असताना पोलिसांना दारू कुठून मिळते? असा उलट प्रश्न देखील विचारला आहे.