Father Carrying Son Across Flooded River Video : केंद्र आणि राज्य सरकारकडून शिक्षणासाठी अनेक योजना राबवल्या जात आहे. या योजनांचा उद्देश भारतातील एकही मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये. मात्र ज्या विकसित भारताबद्दल आपण गप्पा मारतो तिथे ग्रामीण भागातील मुलांना आजही शाळेत जाण्यासाठी किमान आमि सुरक्षित साधन-सुविधा नाहीत. रस्ते, पूल नसलेल्या अनेक गावांमध्ये मुलांना रोज शाळा गाठण्यासाठी अतिशय जीवघेणा प्रवास करावा लागतो. सध्या या वास्तववादी परिस्थितीवर बोट ठेवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. जो पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही,
संबंधित व्हिडीओ बिहारमधील बगहा येथील असल्याचे सांगितले आहेत. जिथे एक वडील आपल्या मुलाचे शिक्षण बंद होऊ नये म्हणून आपल्या जीवाची बाजी लावत पूरग्रस्त नदी पार करुन शाळेत नेत आहे. पित्याने मुलाच्या शिक्षणासाठी उचललेल्या या धाडसी पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी पत्करला धोका (Heart Touching Viral Video Of Father)
प्रयत्न करणाऱ्यांना कधीच अपयश येत नाही असे म्हटले जाते, हे वाक्य व्हिडीओतील पित्याने सत्यात उतरवले आहे. पण यातून सरकारच्या शिक्षणासाठी योजना आणतयं पण मुलांना शाळेत पोहचण्यासाठी साधा पूलही बांधून देत नाही अशी परिस्थिती आहे.
नेपाळमध्ये झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे बिहारमधील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. बिहारच्या बगहा येथील नदीलाही पूर आल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे, ज्यामुळे मुलांचे शाळेत जाणे अशक्य झाले होते. अशा कठीण परिस्थितीत, एका वडिलांनी मुलाचे नुकसान होऊ नये म्हणून त्याला आपल्या खांद्यावर बसवले आणि स्वतः त्या नदीच्या पुरात उतरून ती नदी पार केली. नदी पार करतानाचा हा थरार पाहून पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
व्हिडीओत पाहू शकता, नदीच्या काठावर वडील आपल्या मुलाला खांद्यावर घेतात. त्यानंतर पूराने वेढलेली नदी पार करत ते दुसऱ्या टोकाला पोहोचतात, अशाप्रकारे मुलाला शाळेत पोहोचवण्यासाठी वडिलांना रोजचा जीवघेणा संघर्ष करावा लागतोय.
वडिलांच्या जिद्दीला सलाम!
हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावरील युजर्सही थक्क झालेत. अनेकांना तर डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जात आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ ‘@bihar_youth_congress’ या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला, ज्यावर प्रत्येकजण या पित्याच्या जिद्दीला आणि धाडसाला सलाम करत आहे. मुलाच्या शिक्षणासाठी एका वडिलांनी घेतलेला हा धोका आणि त्यांची जिद्द सध्या चर्चेचा विषय बनला आहे, पण हे विकसित भारतासाठी नक्कीच लाजिरवाणे चित्र आहे.
