Cucumber Viral Video : बिहारमधील कटिहार रेल्वे स्टेशन येथे घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. स्टेशनवर विक्रीसाठी ठेवलेल्या काकड्या एका चमकदार हिरव्या द्रवात बुडवून प्रवाशांना विकल्या जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, यानंतर रेल्वे प्रशासन आणि RPF वर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

हिरव्या द्रवात बुडवून ‘ताजी’ दिसणारी काकडी विक्रीचा आरोप

व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला सोललेल्या काकड्या हिरव्या रंगाच्या द्रवात बुडवत असल्याचे दिसते. त्यानंतर त्या काकड्या प्रवाशांना विकल्या जात असल्याचा दावा करण्यात आला. सोशल मीडियावर अनेकांनी हा प्रकार आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे म्हटले.

रेल्वे स्टेशनवर प्रवासादरम्यान हलका आणि स्वस्त खाऊ म्हणून अनेक जण काकडी खरेदी करतात. मात्र, या घटनेनंतर “फळे-भाज्या खरोखर नैसर्गिक आहेत का?” असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

एनजीओने रेल्वे प्रशासनावर साधला निशाणा

एनसीआयबी मुख्यालय या संस्थेने X वर हा व्हिडीओ शेअर करत रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका केली. पोस्टमध्ये असा आरोप करण्यात आला की, “शेकडो रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे पोलिसांच्या उपस्थितीत प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे, पण प्रशासन झोपले आहे.”

या पोस्टमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच RPF आणि संबंधित अधिकाऱ्यांना टॅग करण्यात आले.

व्हिडीओ व्हायरल होताच रेल्वे संरक्षण दलची मोठी कारवाई

सोशल मीडियावर संताप वाढल्यानंतर रेल्वे संरक्षण दल ने कारवाई करत नऊ महिलांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलेचीही चौकशी करण्यात आली.

माध्यमांच्या वृत्तानुसार, संबंधित महिलेने चौकशीदरम्यान सांगितले की, काकडीवर वापरण्यात आलेला हिरवा पदार्थ हा लग्नसमारंभातील मिठाईमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगासारखाच आहे. मात्र, तो पदार्थ नेमका काय होता आणि तो आरोग्यासाठी सुरक्षित होता का, याचा तपास सुरू आहे.

सोशल मीडियावर संताप; प्रवाशांनी व्यक्त केली भीती

या घटनेनंतर अनेक नेटिझन्सनी रेल्वे स्टेशनवरील स्थानिक खाद्यपदार्थांबाबत चिंता व्यक्त केली.

एका यूजरने लिहिले, “लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्यामुळेच अनेक जण स्थानिक विक्रेत्यांकडून काही खरेदी करणे टाळतात.”

दुसऱ्या एका यूजरने प्रतिक्रिया देताना म्हटले, “जर तिला माहिती असेल की हा पदार्थ विषारी आहे, तर हा थेट लोकांना विष देण्यासारखाच प्रकार आहे.”

तर आणखी एका व्यक्तीने लिहिले, “रेल्वे प्रवासात आता फक्त ब्रँडेड पॅकबंद पदार्थांवरच विश्वास ठेवावा लागेल.”

खाद्यसुरक्षेचा गंभीर प्रश्न; प्रवाशांनी सावध राहण्याची गरज

या घटनेमुळे रेल्वे स्टेशनवर विकल्या जाणाऱ्या उघड्या खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या काकडी , फळे आणि कापलेले पदार्थ खरेदी करताना प्रवाशांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.