Mumbai Madh Jetty Video: मुंबईत वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. मुंबईतील रस्त्यांवर खासगी वाहनांची संख्या वाढू लागल्याने रस्त्यांवरही कायमच वाहतूक कोंडी असल्याचे दिसते. त्यातून मुंबईकरांच्या प्रवास कोंडीत भर पडत आहे. या वाहतूक कोंडीतून सुटकेसंदर्भात नेतेमंडळी, सरकारकडून दर वेळी वेगवेगळी आश्वासनं दिली जातात; मात्र ती पूर्ण होताना फार कमी वेळा दिसतं. याच पार्श्वभूमीवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही लोकप्रतिनिधी आणि सरकारचा संताप येईल.

हा व्हिडीओ मुंबईतील वर्सोवा मढ येथील आहे. मढ आयलंडवर जाण्यासाठी लोकांना जेटीनं प्रवास करावा लागतो. खरं तर हा प्रवास धड १५ मिनिटांचासुद्धा नाही. बोट फक्त एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाते; पण हा प्रवास करण्यासाठी लोकांना दोन ते तीन तास रांगेत उभं राहावं लागतं. अन् ही रांग पाहून खरंच तुम्हीही अवाक् व्हाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोक गाड्या घेऊन रांगेत उभी राहिले आहेत. कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे लोक १०-१५ मिनिटांचा प्रवास करण्यासाठी तासभर जेटीची वाट पाहत आहेत.

सध्या वर्सोवा-मढदरम्यान फेरी बोटीनं प्रवास केला जातो. या फेरी बोटीद्वारे दुचाकी वाहनं आणि प्रवाशांचीही वाहतूक होते. अवघ्या १० मिनिटांत हा प्रवास होतो. या फेरी पहाटे ५ वाजल्यापासून सुरू होतात. मालाड, मढ, वर्सोवा येथे वाहनानं जायचं असेल, तर तब्बल दीड तासाचा २१ ते २२ किमी प्रवास करावा लागतो आणि वाहतूक कोंडी झाल्यास हाच प्रवास दोन तासांवर पोहोचतो. पावसाळ्यात तर या फेरी बोटी बंद असतात आणि ओहोटीच्या वेळीही फेरी बोट सेवा बंद ठेवावी लागते. त्यामुळे रस्त्याने प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. स्वाभाविकत: वर्सोवा-मढदरम्यान पूल बांधण्याची मागणी होत होती. यावेळी तिथल्या स्थानिक उमेदवारांकडून याबाबत आश्वासनही देण्यात आलं; मात्र अद्याप त्याबाबतची काहीच हालचाल दिसत नाहीये.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” एवढ्याशा खारुताईनं बिबट्याची काय अवस्था केली पाहाच

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Mumbaikhabar9 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या समस्येबाबत आता लोक टीका करत असून, सरकारला जाब विचारत आहेत. तसेच मढ-वर्सोवादरम्यान खाडीवरील पुलाच्या बांधकामाचं काय, असा सवाल उपस्थित करीत आहेत. तर आणखी एकानं, “निवडणुकांच्या तोंडावर फक्त खोटी आश्वासनं देतात दरवर्षी”, अशी टीकाही केली आहे.

Story img Loader