Bison Throws Man 10 Feet into the Air, Video Goes Viral: वन्य प्राण्यांना दूरून पाहणं अनेकांना रोमांचक वाटतं. मात्र, कधी कधी हाच रोमांच जीवावरही बेतू शकतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर क्षणभर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. शांतपणे बसलेला एक प्रचंड रानगवा (बायसन) अचानक संतापतो आणि काही सेकंदांतच अशी घटना घडते की पाहणाऱ्यांच्याही काळजाचा ठोका चुकतो.
व्हिडीओच्या सुरुवातीला एक विशाल रानगवा रस्त्याच्या कडेला निवांत बसलेला दिसतो. सर्व काही अगदी शांत असल्याचं वाटत असतानाच एक जोडपं तेथे थांबतं. त्या दोघांचं संपूर्ण लक्ष रानगव्याकडे असतं. ते त्याच्याकडे अगदी जवळून पाहू लागतात. काही क्षण सर्व काही सुरळीत सुरू असतं, पण अचानक परिस्थिती पूर्णपणे बदलते.
बहुधा त्या व्यक्तींच्या हालचालींमुळे रानगव्याला स्वतःची सुरक्षितता धोक्यात आहे, असे वाटले असावे. त्यामुळे त्याने क्षणार्धात आक्रमक पवित्रा घेऊन, त्याने भरधाव वेगाने त्या दोघा व्यक्तींपैकी एकाकडे धाव घेतली. एवढा मोठा आणि बलदंड प्राणी थेट आपल्या दिशेने येताना पाहून त्या व्यक्तीची अक्षरशः घाबरगुंडी उडाली.
जीव वाचवण्यासाठी तो जवळच असलेल्या झाडामागे लपण्याचा प्रयत्न करतो. झाडाचा आधार घेतल्यास रानगवा पुढे जाणार नाही, अशी त्याची अपेक्षा असावी. पण, रानगव्याचा वेग आणि संताप इतका प्रचंड असतो की हा प्रयत्न काहीच कामी येत नाही. एका क्षणात तो झाडाला वळसा घालतो आणि थेट त्या व्यक्तीवर झडप घालतो.
त्यानंतर जे घडतं, ते अत्यंत भीषण आहे. रानगवा आपल्या शिंगांनी त्या व्यक्तीला इतक्या जोरात धडक देतो की तो अक्षरशः हवेत उडतो. व्हिडीओमध्ये ती व्यक्ती सुमारे दहा फूट हवेत उंच फेकली गेल्याचं दिसतं. काही क्षणांसाठी त्याचं शरीर पूर्णपणे हवेत उलटं फिरतं आणि नंतर तो जोरात जमिनीवर आदळतो. हा संपूर्ण प्रसंग इतक्या वेगाने घडतो की आजूबाजूला उपस्थित असलेल्यांनाही काही समजण्याआधी सर्व काही संपलेलं असतं.
या घटनेदरम्यान त्या व्यक्तीसोबत असलेली महिला घाबरून किंचाळताना ऐकू येते. व्हिडीओ याच ठिकाणी संपतो, त्यामुळे त्या व्यक्तीला नेमकी किती दुखापत झाली किंवा त्याची प्रकृती कशी आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, त्यामुळे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून नेटकरीही त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिलं, ‘वन्य प्राण्यांच्या अगदी जवळ जाण्याचा आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह अनेकदा महागात पडतो.’ तर दुसऱ्याने म्हटलं, ‘धडक इतकी जबरदस्त होती की पाहूनच अंग शहारलं. देव करो, ती व्यक्ती सुरक्षित असो.’
वन विभाग आणि वन्यजीव तज्ज्ञ नेहमीच वन्य प्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखण्याचा सल्ला देतात. कारण ते शांत दिसत असले तरी त्यांच्या वर्तनाचा अंदाज बांधणं अशक्य असतं. स्वतःला धोका असल्याचं वाटताच ते क्षणार्धात आक्रमक होऊ शकतात.
येथे पाहा व्हिडीओ
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ अमेरिकेतील ‘यलोस्टोन नॅशनल पार्क’मधील असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या घटनेबाबत अधिकृतरीत्या संपूर्ण तपशील समोर आलेला नाही.
