River Cleaning Viral Video: आजच्या काळात सोशल मीडियावर अनेकदा निरर्थक आणि विनोदी गोष्टीच व्हायरल होताना दिसतात. मात्र कधीकधी अशा काही गोष्टी समोर येतात ज्या थेट मनाला भिडतात आणि समाजासाठी प्रेरणा ठरतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आहे मध्य प्रदेशातील ब्यावरा येथील २० वर्षीय तरुण बिट्टू तबाही याची. जिथे लोक फक्त प्रदूषण आणि घाणीबद्दल तक्रार करत राहतात, तिथे बिट्टूने कोणत्याही मोठ्या मदतीशिवाय एकट्या जीवावर प्रदूषित नदी स्वच्छ करण्याचा विडा उचलला. त्याच्या या जिद्दीने केवळ नदीचे स्वरूपच बदलले नाही, तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
मित्रांनी साथ सोडली, पण बिट्टू मागे हटला नाही
बिट्टूने २६ जानेवारी रोजी आपल्या काही मित्रांसोबत मिळून अज्नार नदी स्वच्छ करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला काही मित्र त्याच्यासोबत होते, पण हळूहळू सर्वांनी साथ सोडली. अखेर बिट्टू एकटाच या मोहिमेत ठाम राहिला. हातात साधी अवजारे आणि मनात मोठा निश्चय घेऊन तो दररोज नदीत उतरत असे. प्लास्टिक कचरा, शेवाळं आणि साचलेली घाण तो स्वतः बाहेर काढत राहिला. हे काम कठीण होते, पण त्याने हार मानली नाही.
टीकाकारांना दिले चोख उत्तर
बिट्टूने जेव्हा हे काम सुरू केले, तेव्हा अनेकांनी त्याची थट्टा केली. “फक्त सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यासाठी तो हे नाटक करत आहे,” अशी टीकाही त्याच्यावर झाली. मात्र बिट्टूने याकडे दुर्लक्ष केले. त्याने आपल्या कामातून सिद्ध करून दाखवले की, जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर एकटा माणूसही मोठा बदल घडवू शकतो. आज त्याच्या मेहनतीचे फळ दिसत असून नदीचे पाणी पूर्वीपेक्षा कितीतरी स्वच्छ झाले आहे.
आनंद महिंद्रांकडून कौतुक
बिट्टूच्या या कार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले ‘स्वच्छतेपूर्वी आणि स्वच्छतेनंतरचे’ व्हिडिओ पाहून दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा देखील भारावून गेले. महिंद्रा यांनी त्याचे कौतुक करताना त्याला “Monday Motivation” म्हटले आहे. त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले की, “जर सोशल मीडियावरील ‘लाईक्स’ मिळवण्याची इच्छा एखाद्याला अशा चांगल्या कामासाठी प्रवृत्त करत असेल, तर त्यात काहीच गैर नाही.”
इंटरनेटवर होतोय ‘रिअल हिरो’चा वर्षाव
नेटकऱ्यांनी बिट्टूची तुलना थेट ‘माउंटन मॅन’शी केली असून त्याला “रिअल हिरो” आणि “एकटा योद्धा” असे म्हटले आहे. अनेक युजर्सनी त्याला आर्थिक मदत करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. बिट्टू तबाहीची ही कथा केवळ नदी स्वच्छतेची नसून, बदलाची सुरुवात स्वतःपासून करण्याच्या विचारसरणीची आहे.
