पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाची सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा आहे. आज ट्विटर, फेसबुकसारख्या माध्यमांवर मोदींच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा पाऊस पडत असतानाच मोदी समर्थक आणि विरोधक आमने सामने आल्याचं चित्र दिसत आहे. असं असतानाच दुसरीकडे दिल्ली भाजपाचे नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करणारं एक गाणं तयार करत त्यांना शुभेच्छा दिल्यात. भक्त अँथम म्हणजेच मोदी भक्तांचे गीत या नावाने हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून या गाण्याची सोशल नेटवर्किंगवर चर्चा आहे.
बग्गा यांनी ट्विटरवरुन लिंक शेअर करत या गाण्यासंदर्भात माहिती दिलीय. “मी स्वत: लिहिलेलं आणि माझ्या आवाजात माझे हिरो असणाऱ्या पंतप्रधान मोदीजींसाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गायलेलं हे गाणं. अपेक्षा आहे की हे भक्त अँथम तुम्हाला आवडेल,” असं बग्गा म्हणाले आहेत.
हे गाणं एक रॅप साँग प्रकारातील असून गाण्याच्या सुरुवातीलाच मोदी सत्तेत येण्याआधी काँग्रेसने घोटाळे केल्याचा उल्लेख आहे. संपूर्ण देशभरामध्ये या घोटाळ्यांची चर्चा होती असं सांगतानाच सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वडेरा यांचाही उल्लेख या गाण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी तिहेरी तलाख रद्द केला, राम मंदिराचं भूमिपूजन केलं, कलम ३७० हटवलं याचा मला अभिमान आहे. मी भक्त असल्याने थोडा लाउड म्हणजेच आक्रमक आहे असं या गाण्यात म्हटलं आहे. मी प्राऊड भक्त असून फ्रॉड नाहीय याचा अभिमान आहे असे गाण्याचे शब्द आहेत. तसेच गाण्यामध्ये मी कोणाचा चमचा नाहीय, असंही म्हटलं आहे. मोदींनी केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडताना त्यांनी डायरेक्ट मनी ट्रान्सफर, वन रँक वन पेन्शनसारख्या योजना राबवल्याचं या गाण्यात सांगण्यात आलंय तसेच मोदींनी सर्जिकल स्टाइक करुन पाकिस्तानला धडा शिकवला असून आता दहशतवादी हल्ले होत नाहीत असंही गाण्यात नमूद करण्यात आलंय.
Tried to write and Record something in my Voice to wish My Hero, PM @narendramodi ji on his Birthday. Hope you will Like#BhaktAnthem
#HappyBdayModiji https://t.co/MArXUcNknX— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) September 16, 2021
मोदींच्या वाढदिवसानिमित्त रात्री १२ वाजता हे गाणं प्रकाशित करण्यात आलं असून त्याला हजारोंच्या संख्येेने व्ह्यूज आहेत. सोशल नेटवर्किंगवरही या गाण्याचं नाव म्हणजेच #BhaktAnthem हा शब्द ट्रेण्ड होताना दिसतोय. मोदींच्या वाढदिवसानिमित्त आज काँग्रेसकडून राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा केला जातोय.