Borivali 82-Year-Old Mansukh Kaka Story Goes Viral: मुंबई… स्वप्नांचं शहर! इथे प्रत्येक जण मोठी स्वप्नं घेऊन येतो. काहींची स्वप्नं पूर्ण होतात; तर काहींच्या आयुष्याची दिशा एका क्षणात बदलून जाते. पण, परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार न मानणारी काही माणसं आपल्या जिद्दीनं जगाला जगण्याचा नवा अर्थ शिकवून जातात. सध्या मुंबईतील बोरिवली येथील ८२ वर्षीय मनसुखकाकांची अशीच एक हृदयस्पर्शी कहाणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ज्या वयात माणसाला कुटुंबाचा आधार, विश्रांती आणि शांत आयुष्याची गरज असते, त्या वयात मनसुखकाका रोज सकाळी घराबाहेर पडतात. हातात त्यांच्या छोट्याशा व्यवसायाची जबाबदारी असते आणि मनात एकच ध्यास… स्वाभिमानानं जगण्याचा.
मनसुखकाकांनी आयुष्यभर एका साडीच्या दुकानात विक्रेता म्हणून काम केलं. अनेक वर्षं प्रामाणिकपणे नोकरी केल्यानंतर त्यांना वाटलं होतं की, आता आयुष्य निवांत जाईल. पण, नियतीनं काही वेगळंच ठरवलं होतं.
कोरोना महामारीनं लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त केले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यात मनसुखकाकांचाही समावेश होता. एवढंच नाही, तर ते स्वतःही आजारी पडले. त्यांच्या आजारपणात त्यांची काळजी घेण्यासाठी मुलालाही स्वतःची नोकरी सोडावी लागली. घरातील उत्पन्नाचे सर्व मार्ग जवळपास बंद झाले आणि कुटुंबासमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं.
मात्र, परिस्थितीसमोर हात टेकण्याऐवजी मनसुखकाकांनी पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला.
आज ते बोरिवलीमध्ये रस्त्याच्या कडेला छोटासा स्टॉल लावून घरखर्चाला हातभार लावत आहेत. वयाची ८२ वर्षं, चालताना त्रास, शरीराची साथ कमी… पण तरीही दिवसाचे तब्बल १२ तास ते आपल्या स्टॉलवर बसून किंवा उभं राहून ग्राहकांची वाट पाहतात.
त्यांच्या स्टॉलवर विक्रीसाठी असलेले पदार्थ त्यांच्या बहिणी स्वतः घरी तयार करतात. विविध प्रकारचे घरगुती पदार्थ तयार करून, त्या मनसुखकाकांना देतात आणि ते दिवसभर ते विकण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक वस्तू विकल्यानंतर ते काळजीपूर्वक आपल्या वहीत त्याची नोंद करतात, कारण काहीही विसरायचं नाही, ही त्यांची सवय आजही कायम आहे.
इतकी मेहनत करूनही त्यांची दिवसाची कमाई अवघी सुमारे ३०० रुपयांपर्यंतच पोहोचते. एवढ्या उत्पन्नातून घर चालवणं किती कठीण असेल, याची कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे.
मनसुखकाकांची ही संघर्षमय कहाणी सोशल मीडियावर आराधना चॅटर्जी यांनी शेअर केली. त्यांनी व्हिडीओसोबत भावनिक आवाहन करत, ज्यांना शक्य असेल त्यांनी मनसुखकाकांना मदतीचा हात द्यावा, अशी विनंती केली. व्हिडीओमध्ये त्यांनी काकांच्या स्टॉलचे ठिकाणही सांगितलं आहे, जेणेकरून मुंबईतील नागरिकांना प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याकडून वस्तू खरेदी करता येतील.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मनसुखकाकांच्या जिद्दीला सलाम केला. अनेक जण त्यांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. आराधना यांनी इच्छुकांसाठी बँकेची माहितीही उपलब्ध करून दिली आहे, जेणेकरून गरजूंना मदत थेट पोहोचवणे शक्य होईल.
मनसुखकाकांची ही कहाणी केवळ संघर्षाची नाही, तर स्वाभिमान, मेहनत करीत राहणाऱ्या आणि न हार मानणाऱ्या वृत्तीची आहे. आयुष्य कितीही कठीण वळणावर उभं राहिलं, तरी धैर्य सोडू नये, याचं जिवंत उदाहरण म्हणजे बोरिवलीतील हे ८२ वर्षीय मनसुखकाका.
