Borivali Skywalk Video Viral : पश्चिम उपनगरातील गजबजलेल्या बोरिवली स्थानक परिसरातील स्कायवॉकवरील धक्कादायक घटनांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर यापूर्वीही व्हायरल झाले आहेत. यात पुन्हा एकदा रात्रीच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही महिला आणि पुरुष हातात काठ्या घेऊन एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत. यावेळी ते एकमेकांचे सामान स्कायवॉकवरून फेकताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत पाहू शकता की, स्कायवॉकवरील बेघर एकमेकांशी वाद घालताना दिसतायत. यावेळी काही महिला व पुरुष हातात काठ्या घेऊन एकमेकांवर हल्ल्याचा प्रयत्न करतायत. धक्कादायक बाब म्हणजे, या राड्यात पुरुषांच्या बरोबरीने महिलाही एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. मारहाणीदरम्यान संतापलेल्या काही लोकांनी स्कायवॉकवरील सामान आणि वस्तू थेट खाली मुख्य रस्त्यावर फेकून दिल्या, ज्यामुळे खालून जाणाऱ्या वाहनचालकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता. मात्र, हे आत्ताचं नाही; यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

बोरिवली पश्चिम रेल्वेस्थानकाला जोडणाऱ्या या स्कायवॉकचा वापर रोज हजारो नोकरदार आणि नागरिक करतात. मात्र, रात्रीच्या वेळी या ठिकाणी असे राडे, गर्दुल्ल्यांचा वावर आणि अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांचे वाद वारंवार होत असल्याने सर्वसामान्य पादचाऱ्यांमध्ये विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “स्कायवॉकवरून रात्री चालणे आता असुरक्षित झाले आहे, प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी,” अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मुंबई पोलिसांनी याची गंभीर दखल घेण्याची आणि स्कायवॉकवर रात्रीची सुरक्षा आणि पोलिस गस्त (Night Patrolling) वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.