अनेकांना असं वाटतं की, ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबणं म्हणजेच व्यावसायिकता. मात्र, कामाच्या ओघात स्वतःच्या शारीरिक व मानसिक मर्यादा दुर्लक्षित करणं कितपत योग्य आहे, हा खरा प्रश्न आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप चर्चेत आहे. त्यात एक तरुणी वेळेवर ऑफिसमधून निघताना बॉसनं दिलेलं अतिरिक्त काम नाही करणार, असं स्पष्टपणे सांगते. हा व्हिडीओ बघून अनेक तरुणांना स्वतःचे विचार मांडण्याची प्रेरणा मिळत आहे.
इन्स्टाग्रामवर शताक्षी पांडे नावाची तरुणी आपला अनुभव सांगताना दिसते. ती म्हणते की, ऑफिसच्या वेळेनंतर जास्त काम करायला सांगणं आणि त्याला ‘हार्ड वर्क’ म्हणणं चुकीचं आहे. शताक्षीनं आपलं काम वेळेत पूर्ण करून, नंतर ती घरी जायला निघाली. बॉसनं दिलेलं जास्तीचं काम करायला तिनं नकार दिला. शताक्षीनं या ठामपणे दिलेल्या उत्तराचा व्हिडीओ लगेच व्हायरल झाला.
व्हिडीओमध्ये शताक्षी सांगते की, ती ऑफिसमधून वेळेवर निघत होती आणि माझं काम मी पूर्ण केलं होतं; पण बॉसनं अचानक तिला आणखी काम करण्यास सांगितलं. शताक्षीनं शांतपणे नकार दिला. कारण- तिचं काम आधीच संपलं होतं. बॉस रागावला आणि त्यानं, रात्री ट्रेनमध्ये किती तास काम केलं, ऑफिसमध्ये किती तास उभं राहावं लागलं, असं म्हणत आपली कहाणी सांगू लागला. पण, शताक्षी स्पष्टपणे म्हणाली, “फक्त जास्त काम करणं म्हणजे प्रोफेशनल असणं नाही; तर मन शांत ठेवणं आणि जीवनात संतुलन असणं खूप महत्त्वाचं आहे.”
पाहा व्हिडीओ
व्हिडीओ झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या विविध स्वरूपात प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी शताक्षीच्या धैर्याचं कौतुक केलं. काहींनी म्हटलं की, ही Gen Z ची जागरूकता आहे, जी फक्त कामावर लक्ष ठेवत नाही, तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यालाही महत्त्व देते. काही लोकांनी आपले अनुभव सांगितले, जिथे जखमी असतानाही काम करावे लागले.
आजकाल मानसिक आरोग्य आणि वर्क लाइफ बॅलन्स हे खूप मोठे मुद्दे बनले आहेत. शताक्षीचा अनुभव लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतोय, जे कामात हुशारी दाखवू इच्छितात; पण स्वतःला हरवत नाहीत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ फक्त मनोरंजन करीत नाही, तर “काम कर; पण स्वतःला विसरू नकोस”, असा एक मोठा संदेश देतो.
