Boy Drags Girlfriend with Bike: लग्नाच्या एका निर्णयाने संतापाचा असा उद्रेक झाला की, एका तरुणाने सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप करण्यात आला आहे. भररस्त्यात एका तरुणीला दुचाकीला लटकवत जवळपास १०० मीटरपर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत असून, तो पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. तरुणीला वाचवण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली, आरोपीला पकडून चोप दिला. नेमकं हे प्रकरण काय आहे, याची माहिती समोर येताच अनेकांना धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील राजगीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. जखमी झालेली तरुणी राजगीर परिसरातील रहिवासी असून, आरोपी तरुण हा शेजारच्या नवादा जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. दोघांमध्ये बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. तरुणीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काही काळानंतर त्याने आपला शब्द फिरवला. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले.

घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून जोरदार वाद झाल्याचे सांगितले जाते. बोलाचाली सुरू असतानाच आरोपीने अचानक दुचाकी सुरू केली आणि तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत दुचाकी पकडली. मात्र, थांबण्याऐवजी आरोपीने दुचाकीचा वेग वाढवल्याचा आरोप आहे, त्यामुळे तरुणीचा तोल गेला आणि ती रस्त्यावर ओढली जाऊ लागली.

प्रत्यक्षदर्शिंनी सांगितल्याप्रमाणे, तरुणीला तब्बल १०० मीटरपर्यंत रस्त्यावर फरफटत नेण्यात आले. या घटनेत तिच्या शरीराला गंभीर दुखापती झाल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्यावर घडणारा हा प्रकार पाहून परिसरातील नागरिक हादरले. अनेकांनी आरडाओरडा करत आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो दुचाकीचा वेग वाढवतच राहिल्याचे सांगितले जाते.

अखेर काही अंतर गेल्यानंतर आरोपीची दुचाकी अचानक अनियंत्रित झाली आणि रस्त्यावर कोसळली. ही संधी साधत घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आरोपीला पकडले. संतप्त जमावाने त्याला चांगलाच चोप दिला. या गोंधळादरम्यान उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने संपूर्ण घटना मोबाईलमध्ये चित्रित केली. काही वेळातच हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि त्यानंतर या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू झाली.

व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तरुणीला अशा पद्धतीने फरफटत नेल्याचे दृश्य पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. समाजमाध्यमांवर या घटनेविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत राजगीर पोलिसांनी अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, व्हायरल झालेल्या व्हिडीओची पडताळणी केली जात आहे. तसेच इतर पुरावेही गोळा करण्यात येत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

येथे पाहा व्हिडीओ

सध्या या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादाचे इतके भीषण रूप पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, या प्रकरणातील सर्व तथ्ये तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत.