Injured Crow Inspiring Video : नशिबाने साथ सोडली तरी कष्टाने आणि जिद्दीने पुन्हा उभं राहता येतं, याचा जिवंत प्रत्यय सध्या एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून येतोय. अनेकदा आयुष्यात एखादं छोटं संकट आलं की, आपण हताश होतो, नशिबाला दोष देतो किंवा प्रयत्न करणं सोडून देतो. पण निसर्गातील एका जिद्दी जीवाने आज माणसाला आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकवला आहे. संकटांवर मात करून कसं जगायचं, याचं उत्तम उदाहरण एका जखमी कावळ्याने दिलं आहे. सध्या सोशल मीडियावर एका जखमी कावळ्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कावळा अत्यंत दयनीय अवस्थेत दिसत आहे. या कावळ्याची चोच अर्धवट तुटलेली आहे आणि त्याचा एक पायही पूर्णपणे जायबंदी झाला आहे. उडताना किंवा अन्न शोधताना अशा पक्षाला किती यातना होत असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण निसर्गाचा हा छोटासा जीव मृत्यूसमोर झुकलेला नाही. समोर ठेवलेल्या एका भांड्यातून अन्न खाणयासाठी तो ज्या प्रकारे धडपड करतोय, ती पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.
परिस्थितीपुढे हार मानली नाही! संकटातही धडपडणाऱ्या कावळ्याचा व्हिडिओ व्हायरल
कावळ्याची ही स्थिती पाहून ‘जिद्द असेल तर काहीही शक्य आहे’ याची प्रचिती येते. निसर्गातील हा छोटासा जीव आज माणसाला जीवनाकडे पाहण्याचा एक नवा आणि सकारात्मक दृष्टिकोन देऊन जात आहे.
व्हिडीओत पाहू शकता, कावळा चोच आणि पाय तुटलेला असताना अन्न खाण्यासाठी एका पायावर स्वतःचा तोल सांभाळ कसरत करतोय, हे सर्व दृश्य केवळ थक्क करणारं नाही तर डोळ्यांत पाणी आणणारं आहे.
सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, नेटकरी या कावळ्याच्या ‘फायटिंग स्पिरिट’ला सलाम करत आहेत. kokani_pratiksha_ नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्सही वेगवेगळ्या कमेंट्स करतायत. एकाने कमेंटमध्ये लिहिले की, जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करतो त्यालाच उद्याचे यश अनुभवायला मिळते…दुसऱ्याने लिहिले की, हे दृश्य जीवनातील एक छान उदाहरण आहे…. तिसऱ्या एकाने लिहिले की, इच्छाशक्ती मजबूत हवी, मग जग जिंकता येत.
