Brothers Dance at Sister Sangeet: लग्नसराईचा हंगाम सुरू झाला की, सोशल मीडियावर एकापेक्षा एक मजेदार, भावूक आणि थक्क करणारे व्हिडीओ समोर येत असतात. कधी नवरा-नवरीचा खास डान्स चर्चेत येतो; तर कधी कुटुंबातील सदस्यांच्या अनोख्या परफॉर्मन्समुळे कार्यक्रम रंगतदार होतो. सध्या असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन भाऊ आपल्या बहिणीच्या संगीत सोहळ्यात असा जबरदस्त डान्स करतात की, उपस्थित पाहुण्यांपासून ते सोशल मीडियावरील नेटकऱ्यांपर्यंत सर्व जण अक्षरशः थक्क झाले आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये बहिणीच्या लग्नाच्या संगीत कार्यक्रमात रंगलेले वातावरण दिसून येते. स्टेजवर प्रकाशझोत, आजूबाजूला टाळ्यांचा कडकडाट आणि मधोमध उभे असलेले दोन भाऊ; इतक्यात संगीत सुरू होते आणि दोघेही पूर्ण जोशात नृत्याला सुरुवात करतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, नृत्याची लय आणि स्टेप्समधील अचूक ताळमेळ पाहून प्रेक्षक अक्षरशः भारावून जातात.
दोन्ही भावांनी पारंपरिक कुर्ता-पायजमा परिधान केला असून, त्यांचा संपूर्ण लूकही कार्यक्रमाच्या वातावरणाला साजेसा दिसतो. विशेष म्हणजे त्यांनी ‘शरारत’ गाण्यावर सादर केलेली नृत्यरचना पाहणाऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेते. हे गाणे ‘धुरंधर’ चित्रपटातील असून, त्यात अभिनेता रणवीर सिंह झळकला होता. गाण्याच्या प्रत्येक ठेक्यावर दोन्ही भाऊ ज्या अचूकतेने आणि ऊर्जा भरलेल्या हालचाली करतात, ते पाहून असे वाटते की, या नृत्यासाठी त्यांनी भरपूर सराव केला असावा.
नृत्यादरम्यान त्यांच्या स्टेप्स इतक्या समन्वयानं सादर होतात की, क्षणभरासाठी प्रेक्षकांची नजर स्टेजवरून हटतच नाही. त्यांच्या नृत्यातील जोश, आत्मविश्वास आणि स्टेजवरील प्रभावी उपस्थिती पाहून कार्यक्रमाला उपस्थित असलेले पाहुणेही टाळ्यांच्या गजरात दाद देताना दिसतात. काही जण तर आनंदानं शिट्ट्या मारत त्यांना प्रोत्साहन देताना दिसतात.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vaibhavkhar नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘जेव्हा बहीण नवरी बनते, तेव्हा खरा शो भावांचा असतो.’ ही ओळ पाहताच अनेकांना हा व्हिडीओ अधिकच आवडला आणि काही क्षणांतच तो सोशल मीडियावर प्रचंड वेगाने पसरू लागला.
सध्या या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिले असून, त्यावर हजारो प्रतिक्रिया येत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला ४० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्याचे सांगितले जात आहे. अनेक नेटकऱ्यांनी भावांच्या नृत्यकौशल्याची मनापासून प्रशंसा केली आहे. एका वापरकर्त्याने टिप्पणी करत लिहिले, “हा डान्स तर मूळ गाण्यापेक्षाही अधिक प्रभावी वाटतो.” तर दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटले, “या गाण्यावर आतापर्यंत पाहिलेली ही सर्वोत्तम पुरुष कोरिओग्राफी आहे.”
दरम्यान, ‘शरारत’ गाण्याला प्रसिद्ध गायिका मधुबंती बागची यांनी आवाज दिला आहे. या गाण्यात अभिनेत्री आयशा खान आणि क्रिस्टल डिसूझा झळकल्या आहेत. मात्र, सध्या सोशल मीडियावर या गाण्यापेक्षा जास्त चर्चा होत आहे ती बहिणीच्या संगीत सोहळ्यात धमाल उडवणाऱ्या या दोन भावांच्या नृत्याची.
येथे पाहा व्हिडीओ
एकूणच भावांनी बहिणीच्या खास दिवशी केलेला हा रंगतदार आणि उत्साही परफॉर्मन्स आता इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला असून, हा व्हिडीओ प्रत्येक जण नक्कीच शेवटपर्यंत थांबून पाहत आहे.
