Who needs a BSNL satellite phone : प्रवासादरम्यान, गावी गेल्यावर किंवा एखाद्या दुर्गम पर्यटनस्थळी अनेकदा मोबाईल नेटवर्क मिळत नाही. अशा वेळी हातात स्मार्टफोन असला तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे प्रवासाचा आनंद घेताना अर्धे लक्ष घरच्यांशी संपर्क तुटणार याकडेच लागून राहिलेले असते. म्हणूनच अशा ठिकाणी जाण्यापूर्वी आपल्या कुटुंबीयांना किंवा जवळच्या व्यक्तींना तेथे नेटवर्क उपलब्ध नसण्याची कल्पना देऊन ठेवतो. पण, आता चिंता करण्याची गरज नाही. कारण – सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने एक ‘सॅटेलाईट फोन’ सादर केला आहे, जो अशा ठिकाणीही काम करतो, जिथे सामान्य मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसते. हा फोन अशा लोकांसाठी आहे, जे दुर्गम भागात काम करतात किंवा प्रवास करतात, जिथे मोबाईल सिग्नल कमकुवत असतात किंवा अजिबातच उपलब्ध नसतात.

“जिथे सामान्य मोबाईल नेटवर्क पोहोचू शकत नाही, तिथे BSNL सॅटेलाईट फोन तुम्हाला संपर्कात ठेवतो,” अशी कॅप्शन देऊन बीएसएनएलने सॅटेलाईट फोनबद्दल पोस्ट शेअर केली. कंपनीच्या माहितीनुसार, या सॅटेलाईट फोनची किंमत १,३४,१६६ रुपये इतकी आहे. त्याचबरोबर संरक्षण दलातील कर्मचारी, सागरी मोहिमा, आपत्ती व्यवस्थापन पथके, खाणकाम क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, दुर्गम भागात कार्यरत असलेले लोक, तसेच तीर्थयात्री आणि साहसी पर्यटनाची आवड असलेल्या प्रवाशांसाठी विशेषतः उपयुक्त ठरू शकतो.

याद्वारे युजर्स सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून व्हॉईस कॉल करू शकतात आणि त्यात ‘SOS’ आपत्कालीन सुविधाही उपलब्ध आहे. या उपकरणाची रचना मजबूत (rugged) असून, त्याची बॅटरी दीर्घकाळ चालते. त्यामुळे आव्हानात्मक वातावरणात वापरण्यासाठी हा फोन योग्य ठरतो. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी ग्राहकांनी +९१ ९४६५१ ०१३२३ या क्रमांकावर कॉल करावा किंवा जवळच्या BSNL कार्यालयाला भेट द्यावी, असे आवाहनसुद्धा कंपनीने केले आहे.

बीएसएनएलने ही सेवा जागतिक सॅटेलाईट कम्युनिकेशन कंपनी इनमारसॅट (Inmarsat) यांच्या भागीदारीत विकसित केली आहे. इनमारसॅटच्या उपग्रहांच्या मदतीने हा फोन सामान्य मोबाईल नेटवर्क नसलेल्या दुर्गम आणि दूरवरच्या भागातही संपर्कात राहू शकतो.

BSNL सॅटेलाईट फोन कसा काम करतो?

सामान्य मोबाईल फोनसारखा हा सॅटेलाईट फोन मोबाईल टॉवर्सवर अवलंबून नसतो. त्याऐवजी तो थेट पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांशी (सॅटेलाईट्सशी) जोडला जातो. याचा अर्थ असा की, वापरकर्ते अशा ठिकाणीही व्हॉईस कॉल करू शकतात, जिथे मोबाईल नेटवर्क नाही. त्यामुळे पूर, भूकंप किंवा चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी जेव्हा मोबाईल टॉवर्स बंद पडू शकतात. तेव्हा हा फोन विशेषतः उपयुक्त ठरतो.

कोण खरेदी करू शकते आणि वापरू शकते?

सामान्य स्मार्टफोनप्रमाणे, BSNL सॅटेलाईट फोन मुक्तपणे खरेदी करता येत नाही किंवा वापरता येत नाही. भारतात सुरक्षेच्या कारणास्तव सॅटेलाईट फोनच्या वापरावर कडक नियम आहेत. त्यामुळे ज्यांना हा फोन खरेदी करायचा किंवा वापरायचा आहे, त्यांना सर्वप्रथम दूरसंचार विभागाची (DoT) परवानगी घेणे आवश्यक आहे.

सॅटेलाईट फोनचे प्लॅन्स

पोस्टपेड प्लॅन्स

सरकारी प्लॅन G1: ३,५०० रुपये प्रति महिना (१६ मिनिटे / एसएमएस मोफत)
सरकारी प्लॅन G2: ५,८३५ रुपये प्रति महिना (३० मिनिटे/ एसएमएस मोफत)
व्यावसायिक प्लॅन C1: दरमहा ११,६७० रुपये (६० मिनिटे / एसएमएस मोफत)

प्रीपेड प्लॅन्स

सरकारी युजर्स
मासिक प्लॅन G1: ३,५०० रुपये (२० मिनिटे किंवा एसएमएस मोफत)
वार्षिक प्लॅन GA: ३८,५०० रुपये (वर्षभरासाठी २४० मिनिटे किंवा एसएमएस मोफत)

व्यावसायिक युजर्स

मासिक प्लॅन C1: ५,८३५ रुपये (३० मिनिटे किंवा एसएमएस मोफत)
वार्षिक प्लॅन CA: ६४,१८५ रुपये (वर्षभरासाठी ३६० मिनिटे किंवा एसएमएस मोफत)

google trends

मोफत टॉक-टाईम संपल्यानंतर काय होते?

मोफत मिनिटे किंवा एसएमएमची मर्यादा संपल्यानंतर युजर्सना प्रत्येक अतिरिक्त कॉल मिनीट किंवा एसएमएससाठी शुल्क द्यावे लागते.

सरकारी ग्राहक – १८ रुपये प्रति मिनीट/ एसएमएस
व्यावसायिक ग्राहक – २५ रुपये प्रति मिनीट/ एसएमएस

प्रीपेड युजर्स रिचार्ज करू शकतात का?

हो. सेवा वापरणे सुरू ठेवण्यासाठी प्रीपेड वापरकर्ते टॉप-अप रिचार्ज खरेदी करू शकतात. टॉप-अप रिचार्ज (Top-up Recharge) म्हणजे मोबाईलमध्ये फक्त बॅलन्स (Talktime) वाढविण्यासाठी केलेला रिचार्ज. बीएसएनएल २००, ५००, १,०००, ५,००० व १०,००० रुपयांचे टॉप-अप्स प्लॅन्स युजर्ससाठी उपलब्ध करून देते आहे.