Bus Burning Video: लाइटहाऊस जर्नलिझमला एका जळणाऱ्या बसचा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. या व्हिडीओसह असा दावा करण्यात आला होता की, डीआरडीओचे ३ अभियंते प्रवास करत असणाऱ्या बसला बंगळुरूमध्ये मॅग्नेटिक बॉम्बने उडवण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यात डीआरडीओचे तीनही अभियंते ठार झाल्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे. डीआरडीओच्या 'एचएएल तेजस फ्लाइट चाचणी सुविधा'कक्षाच्या पश्चिमेला चार किमी अंतरावर ही घटना घडली, असेही सांगण्यात आले. याबाबतच्या तपासात समोर आलेली माहिती जाणून घेऊया.. काय होत आहे व्हायरल? X यूजर Pakistan First ने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडीओ शेअर केला. इतर वापरकर्ते देखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर करत आहेत. तपास: आम्हाला TOI Bengaluru वर एक दिवस आधी केलेली पोस्ट सापडली. पोस्ट मध्ये म्हटले होते की: A #BMTC bus (route 144E) caught fire at Anil Kumble Circle on M G Road around 9 am. #Fire was first noticed in the engine. All the passengers disembarked, no casualties. भाषांतर: MG रोडवरील अनिल कुंबळे सर्कल येथे सकाळी ९ च्या सुमारास #BMTC बसला (रूट 144E) आग लागली. इंजिनमध्ये आग लागल्याचे लक्षात आल्यावर तातडीने बस रिकामी करण्यात आली, सर्व प्रवासी सुखरूप उतरले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आम्हाला या बाबतीत बऱ्याच पोस्ट्स सापडल्या. या बातम्यांमध्ये असे सुचवले होते की, आज सकाळी बंगळुरूमध्ये ड्रायव्हरने इंजिन सुरू केल्यावर एका सार्वजनिक बसने पेट घेतला. बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरने आग लागल्याचे कळताच चपळाई दाखवल्याने घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. ही बस कोरमंगला आगार येथील आहे. वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेला त्वरीत प्रतिसाद देत आजूबाजूच्या परिसरातील सुरक्षितता सुनिश्चित केली. अग्निशमन दल सकाळी नऊ वाजता घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. अहवालात नमूद केले आहे: F 1235 क्रमांकाच्या बसला, मार्ग क्रमांक 144E/11, (कोरमंगला डेपो) येथे सकाळी नऊ च्या सुमारास आग लागली. कोणतीही जीवितहानी झाली नाही. Asianet Newsable ने आणखी एक व्हिडिओ अपलोड केला आहे. व्हिडीओचे शीर्षक होते: बंगळुरूमध्ये बस चालकाने वाचवले ६० जीव, BMTC बसला आग आम्ही DRDO अभियंत्यांवरील हल्ल्याबाबत माहिती देणारे अहवाल देखील तपासले परंतु त्याबद्दल कोणतेही अहवाल दिसले नाहीत. निष्कर्ष: बंगळुरूमधील जळत्या बसचा व्हिडीओ हा दुर्घटनेतील आहे, यातही जीवितहानी झालेली नाही. DRDO च्या अभियंत्यांवर हल्ल्या केल्याचा व्हायरल दावा दिशाभूल करणारे आहे.