अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक खूपच चुरसीची झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. मात्र बायडेन यांचा या निवडणुकीमध्ये विजय होणार असं निश्चित मानलं जात आहे. ३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर बुधवारपासून या निवडणुकीचा निकाल लावण्यासाठी मतमोजणी सुरु आहे. मात्र या मतमोजणीदरम्यानच सध्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या निवडणुकीमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप केले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव जवळजवळ निश्चित आहे.

नक्की पाहा >> व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना  नक्की कोणत्या सुविधा मिळतात?

मतमोजणी सुरु असून राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत आपण पिछाडीवर पडत असल्याचे दिसल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर घोटाळयाचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्यासाठी न्यायालयामध्ये धावही घेतली, पण जॉर्जिया आणि मिशिगन मधल्या न्यायाधीशांनी डोनाल्ड ट्रम्प यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळेच एकीकडे जिंकण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या ट्रम्प यांनी दुसरीकडे राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असणाऱ्या व्हाइट हाऊसमधून सामान बांधण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे.

नक्की वाचा >> पराभवानंतरही ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडलं नाही तर काय होणार?

ट्रम्प यांनी मतमोजणी सुरु झाल्यापासूनच वेगवेगळे दावे करण्यास सुरुवात केली असून आपण ही निवडणूक आधीच जिंकलो असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इलेक्ट्रोल व्होट्समध्ये बायडेन हे ट्रम्प यांच्यापेक्षा खूपच पुढे आहेत. त्यामुळे ट्रम्प यांचा पराभव निश्चित समजला जात आहे. म्हणून ट्विटवरही अनेकांनी बाय बाय ट्रम्प अशा पद्धतीचा हॅशटॅग ट्रेण्ड केला आहे. याच हॅशटॅगमधील एका ट्विटमध्ये पत्रकार असणाऱ्या डायना ग्रेसन यांनी व्हाइट हाऊसचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये व्हाइट हाऊसच्या मुख्य इमारतीसमोर पॅकर्स अ‍ॅण्ड मुव्हर्सचा एक मोठा ट्रक उभा असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना डायना यांनी, “सामान बांधायला घ्या ट्रम्प, आम्ही आमचं घर परत ताब्यात घेतोय,” असं म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी मतमोजणीदरम्यान ज्या पद्धतीने भूमिका घेतली आहे त्यावरुन ते सहजासहजी व्हाइट हाऊस सोडण्याच्या तयारीत नसल्याचे चित्र आधी दिसत होते. मात्र वेगवेगळ्या राज्यांमधील न्यायालयांनी ट्रम्प यांनी केलेला मतदान प्रक्रियेमधील घोटळ्याचा आरोप फेटाळून लावत याचिका रद्द केल्याने आता ट्रम्प यांनाही व्हाइट हाऊसमधून निघण्यासंदर्भातील हलचाली सुरु केल्याचे दिसत आहे.