कुछ खास है! ‘कॅडबरी’ची ‘ती’ आयकॉनिक जाहिरात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, ‘नव्या ट्विस्ट’ची नेटिझन्सना भुरळ

९० च्या दशकात तुफान लोकप्रिय झालेली ही ‘कॅडबरी’ची जाहिरात आता एका नव्या ट्विस्टसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली आहे.

cadbury-reimagined-its-iconic-vintage-advertisement-netizens-are-loving-it-gst-97
'कॅडबरी'ची 'ती' आयकॉनिक जाहिरात नव्य रूपात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला (Photo : Cadbury)

तुम्हाला तुम्ही बालपणी पाहिलेल्या काही खास जाहिराती आजही अगदी नक्की आठवत असतील, ह्यात शंका नाही. त्यातही, जर तुम्ही ९० च्या दशकातले असाल तर त्यावेळच्या अनेक जाहिरातींसोबत ‘कॅडबरी’ची एक जाहिरात ही निश्चितच तुमच्या प्रचंड आवडीची आणि खूप जवळची असेल. ज्यात एक मुलगी आपल्या क्रिकेटर प्रियकराचं शतक साजरं करण्यासाठी थेट क्रिकेटच्या खेळपट्टीवर नाचताना दिसते आहे. ही जाहिरात पाहून एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं नाही, तर नवलच! दरम्यान, ९० च्या दशकात तुफान लोकप्रिय झालेली ही ‘कॅडबरी’ची जाहिरात आता एका नव्या ट्विस्टसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली आहे. विशेष म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पुरती भुरळ पाडण्यात पुन्हा एकदा ‘कॅडबरी’ला यश आलं आहे.

तिचा बेस्ट शॉट अन् त्याचा Iconic डान्स

क्रिकेट हा निःसंशयपणे भारताचा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. विविध ब्रॅंड्सनी वेळोवेळी अत्यंत कल्पकतेने आपल्या जाहिरातींसाठी याचा वापर केला आहे. मात्र, कॅडबरी नेहमीच ह्यात एक पाऊल पुढे आहे. १९९० साली अत्यंत लोकप्रिय झालेली आपली एक जाहिरात कॅडबरीने आता नव्या रूपात ग्राहकांसमोर आणखी आहे. कॅडबरीच्या या नवीन जाहिरातीसाठी विंटेज जाहिरातीसारखंच हुबेहूब दृश्य पुन्हा तयार करण्यात आलं आहे. परंतु, यावेळी इथे एक महिला क्रिकेटर आपल्या बेस्ट शॉट मारण्याच्या आणि शतक पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. अखेर जोरदार षटकार मारून ती आपलं शतक पूर्ण करते आणि आपल्या आपल्या क्रिकेटर प्रेयसीच्या या शॉटनंतर तिचा प्रियकर सुरक्षारक्षकाला चकवून थेट क्रिकेटच्या खेळपट्टीवर येऊन नाचत हा क्षण साजरा करताना दिसत आहे आणि मागे ‘कुछ खास है’ हे जिंगल वाजत आहे.

महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव

तब्बल तीन दशकांनंतर कॅडबरीचे मालक मॉन्डेलेझ आणि जाहिरात एजन्सी ओगिल्वी यांनी आपलू ही जाहिरात या खास ट्विस्टसह परत आणली आहे. या नवीन जाहिरातीमार्फत जेंडर-स्वॅप ट्विस्टसह महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा उत्सव करण्यासाठी कॅडबरीचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. मोंडेलेझ इंडियाचे वरिष्ठ संचालक अनिल विश्वनाथन याबाबत म्हणाले कि, “ओगिल्वी यांच्याकडे एक तरुण सर्जनशील व्यक्ती होती ज्याला ही कल्पना सुचली आणि आम्हाला ती लगेच आवडली. ही जाहिरात आयकॉनिक आहे. क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या कर्तृत्वाचा आणि त्याचसोबत आपल्या आयुष्यातील सर्व महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करण्याची ही वेळ आहे.”

आठवणींना उजाळा

‘कॅडबरी’ची ही जुनी जाहिरात अशा वेळी आली होती जेव्हा आपला देश अत्यंत लक्षणीय बदलांच्या काळातून जात होता. आर्थिक उदारीकरणानंतरच्या काळात सर्वच स्तरांत मोठी अनिश्चितता आणि चिंतेचं वातावरण असताना लोकांपर्यंत अत्यंत सकारात्मक ऊर्जा पोहोचवण्याचं, एक आशादायी आणि उत्साही वातावरण निर्माण करण्याचं काम त्या काळात चित्रपट आणि जाहिरातींनी मोठ्या प्रमाणात आणि उत्तमरित्या केलं. म्हणूनच, ९० च्या दशकातल्या या जाहिराती कायमच प्रेक्षकांच्या खूप जवळच्या आहेत. पुन्हा एकदा बालपणात घेऊन जाणाऱ्या, तो काळ अनुभवायला देणाऱ्या या जाहिराती जेव्हा अशा नव्या विचाराने, नव्या रूपात येतात तेव्हा त्या आणखी खास ठरतात. ‘कॅडबरी’च्या या नव्या जाहिरातीचं सुद्धा असंच भरभरून कौतुक होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cadbury reimagined its iconic vintage advertisement netizens are loving it gst

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी