बंगळुरु येथील एका कॅफेमध्ये आलेलं बिल सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. @HaramiParindey या एक्स अकाऊंटवर हे बिल पोस्ट करण्यात आलं आहे. जे व्हायरल झालं आहे. या बिलाच्या प्रिंटमध्ये दिसतं आहे की कॅफेने गॅस क्रायसिस चार्ज घेण्यास सुरुवात केली आहे.
काय आहे बिलाचा तपशील?
व्हायरल झालेल्या बिलात गॅस क्रायसिस चार्जेस घेण्यात आले आहेत. मात्र या बिलाची चर्चा होते आहे. कारण हे बिल आहे ते दोन लेमोनेडचं. दोन मिंट लेमोनेडची किंमत प्रत्येकी १७९ रुपये आहे. हे बिल ३५८ रुपये आहे. ज्यावर ५ टक्के सूट मिळाली आहे असं नमूद आहे. ती रक्कम १७ रुपये ९० पैसे आहेत. तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा जीएसटी प्रत्येकी ८ रुपये ५० पैसे असा आहे आणि १७ रुपये गॅस क्रायसिस चार्जेस असं मिळून हे एकूण बिल ३७४ रुपये असं झालं आहे.
लेमोनेडच्या बिलावर गॅसचे चार्जेस कसे काय?
लेमोनेडच्या बिलावर गॅस क्रायसिस चार्जेस का घेण्यात येत आहेत? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. सध्या इराण आणि इस्रायल यांच्या संघर्षामुळे देशात एलपीजीचा तुटवडा भासतो आहे. अशात अनेक हॉटेल्सनी गॅस सिलिंडर पुरावेत म्हणून हॉटेल्स काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर अनेक हॉटेल्सनी त्यांच्या मेन्यूमधून निम्मे पदार्थ कमी केले आहेत. अशात आता हे बिल व्हायरल झालं आहे. लेमोनेडवर गॅस चार्जेस घेतल्याने या बिलाची खिल्ली उडवली जाते आहे. लेमोनेडसाठी गॅसचा वापर कसा काय झाला? असाही प्रश्न काही नेटकरी विचारत आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
बिलाची सोशल मीडियावर खिल्ली
हे बिल सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ज्याची लोक खिल्ली उडवत आहेत. एलपीजी गॅसचा तुटवडा आणि लेमोनेडच्या बिलावर गॅस क्रायसिस चार्जेस या दोन्हीचा काहीतरी संबंध आहे का? असा प्रश्न एका युजरने विचारला आहे. तर या बिलाविरोधात ग्राहकाने तक्रार केली पाहिजे असा सल्ला एका नेटकऱ्याने दिला आहे. तर आणखी एका युजरने लेमोनेड तयार करण्यासाठी गॅस लागतो का? कॅफे चालवणारे लोक डोक्यावर पडले आहेत का? असाही प्रश्न विचारला आहे. एकाने लिहिलं आहे की यांनी लेमोनेडमध्ये वापरण्यात येणारं लिंबू बहुदा गॅसवर गरम केलं असेल. आणखी एक युजर म्हणतो कॅफेचे लोक जर गॅसवर लेमोनेड तयार करत असतील तर ते बेकायदेशीर आहे अशा कॅफेजवर कारवाई झाली पाहिजे. ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नुसार या कॅफेला दंड ठोठावला पाहिजे. अशा विविध कमेंट करत या बिलाची खिल्ली उडवली जाते आहे.
