निसर्गाचं ‘ऑप्टिकल इल्यूजन’ म्हणावं असा हा देखणा चमत्कार. पहिल्या नजरेत काहीच दिसत नाही… पण दुसऱ्यांदा पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहतो. हिरव्या पानांच्या गर्दीत अगदी वेलींसोबत मिसळून गेलेला ग्रीन वाइन साप इतक्या कुशलतेने स्वतःला लपवतो की पहिल्याच नजरेत तो दिसतोच नाही. वाऱ्याच्या मंद झुळुकीसोबत हलणारी त्याची हालचाल आणि पानांसारखाच हिरवट रंग पाहून काही क्षण तो खरीच वेल आहे की जिवंत साप, हेच ओळखणं कठीण जातं. पश्चिम घाटातील जंगलात टिपलेला हा व्हिडिओ म्हणजे निसर्ग कसा दृष्टीला फसवू शकतो याचं थक्क करणारं उदाहरण ठरत आहे.
पश्चिम घाटातील घनदाट जंगल… झाडांच्या गर्द पानांमध्ये लपलेला एक साप… आणि त्याला शोधण्याचा एक रोमांचक खेळ. २२ वर्षीय इशान शनवासने शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. कारण या व्हिडिओमध्ये दिसणारा ग्रीन वाइन साप इतक्या उत्तम प्रकारे लपलेला आहे की नीट पाहिले नाही तर तो दिसतचं नाही.
इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये इशान म्हणतो, “दूरून पाहिल्यावर तुम्हाला काहीच दिसणार नाही. पण जर नीट लक्ष दिलं तर पानांमध्ये वेलींसारखा हालणारा हा साप दिसायला लागतो.” कॅमेरा जसजसा झूम होतो, तसतसा हा साप हळूहळू नजरेस पडतो आणि त्याच्या निसर्गात विलीन होऊन जाण्याच्या अद्भुत किमयेने प्रेक्षक थक्क होऊन जातात. वाऱ्याने हलणाऱ्या वेलीसारखं डुलणं ही त्याची जगण्याची रणनीती असल्याचंही तो सांगतो.
इशान पुढे सांगतो, हा साप माणसांची उपस्थिती जाणवली की शांतपणे बाजूला सरकण्याचा प्रयत्न करतो. मात्र तो स्वतः लपला आहे असं गृहित धरतो आणि त्यामुळेच त्याची ही ‘कॅमोफ्लाज’(स्वतःला ओळखू न देता सुरक्षित राहण्यासाठी नैसर्गिकरीत्या लपून राहण्याची कला) कलेची गुपित ताकद अधिक प्रभावी ठरते. हिरवट रंग, सडपातळ शरीर आणि अगदी नैसर्गिक हालचालींमुळे हा साप नजरेआड राहतो, हे अनेकांनी मान्य केले.
हा व्हिडिओ आत्तापर्यंत ३.१ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला असून कमेंट्समध्ये युजर्स अक्षरशः थक्क झाल्याचं दिसतं. “एकदम सुंदर प्रजाती,” असे एकाने लिहिले. तर आणखी एका युजरने म्हटले, “कितीतरी वेळ पुन्हा पाहिलं, मग कुठे दिसला!” पश्चिम घाटासारख्या जैवविविधतेने समृद्ध प्रदेशात निसर्ग जगण्यासाठी किती सूक्ष्म आणि सुंदर मार्ग निवडतो, याचा हा व्हिडिओ उत्तम नमुना असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
