Foods to reduce cancer risk: कर्करोग हा लोकांच्या मनात भीती निर्माण करणारा आजार आहे. त्याचा संबंध अनेकदा मृत्यूशी जोडला जातो; परंतु हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, वेळेवर निदान, योग्य उपचार आणि जनजागृतीद्वारे अनेक प्रकारच्या कर्करोगावर यशस्वीपणे उपचार करता येतात. अयोग्य आहार, खालावलेली जीवनशैली आणि तणाव हे कोणत्याही प्रकारच्या कर्करोगासाठी जबाबदार असतात. आनुवंशिक घटकदेखील या आजारास कारणीभूत ठरू शकतात. शरीरातील पेशी निरोगी ठेवण्यासाठी आणि हानिकारक घटकांशी लढण्यासाठी योग्य पोषण आवश्यक आहे.
प्रख्यात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व हेपॅटोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी या तज्ज्ञाने कर्करोगासारख्या गंभीर आजारांना प्रतिबंध करण्यास मदत करू शकणाऱ्या पाच पदार्थांवर प्रकाश टाकला आहे. चला, या तज्ञांकडून जाणून घेऊया की, कोणत्या पदार्थांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत.
जांभळं रताळं
जांभळ्या रंगाची रताळी कर्करोगविरोधी आहारात एक उत्तम पर्याय मानली जातात. कारण- त्यांमध्ये अँथोसायनिन्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे दाह आणि पेशींच्या नुकसानीपासून संरक्षण करतात. ‘जर्नल ऑफ कॅन्सर प्रिव्हेंशन’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, हे अँथोसायनिन्स कर्करोगाच्या पेशींमधील डीएनएचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि निरोगी पेशींमध्ये होणारे उत्परिवर्तन रोखतात. कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटीच्या एका अहवालानुसार, जांभळ्या रंगाची रताळी खाल्ल्याने मोठ्या आतड्यातील कर्करोगाच्या गाठींची वाढ लक्षणीयरीत्या मंदावते. डॉक्टरांच्या मते, प्रयोगशाळेतील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ही भाजी मोठ्या आतड्याच्या कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करण्यास मदत करू शकते. तज्ज्ञांच्या मते, रताळे जितके जास्त गडद रंगाचे असेल, तितके ते अधिक फायदेशीर ठरते.
ब्रोकोली स्प्राउट्स आणि मायक्रोग्रीन्स खा
ब्रोकोली स्प्राउट्स आणि मायक्रोग्रीन्स यांना कर्करोग प्रतिबंधासाठी सुपर फूड मानले जाते. सौरभने सांगितले की, त्यामध्ये सल्फोराफेन मुबलक प्रमाणात असते, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते. ब्रोकोली स्प्राउट्स आणि मायक्रोग्रीन्सवर केलेल्या वैज्ञानिक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, या केवळ साध्या भाज्या नाहीत, तर त्या कर्करोगविरोधी औषधांना नैसर्गिक पर्याय म्हणूनही काम करतात. ‘मॉलिक्युलर न्यूट्रिशन अँड फूड रिसर्च’मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, सल्फोराफेन कर्करोगाच्या पेशींचे विभाजन थांबवण्यासाठी प्रभावी आहे. ते विशेषतः स्तन, प्रोस्टेट आणि कोलन कर्करोगाच्या स्टेम सेल्सना लक्ष्य करते, ज्यामुळे कर्करोग पुन्हा होण्याचा धोका कमी होतो.
किवी कर्करोगापासूनही संरक्षण करते
किवीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर व पॉलिफेनॉल भरपूर प्रमाणात असतात. हे फळ केवळ पेशींना सुरुवातीच्या नुकसानीपासून वाचवत नाही, तर शरीराच्या डीएनए दुरुस्ती क्षमतेलाही सक्रिय करते. किवीच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत होते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. ‘न्यूट्रिशन अँड कॅन्सर’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, जे लोक किवीचे सेवन करतात, त्यांच्या पेशींमध्ये ऑक्सिडेटिव्ह नुकसान लक्षणीयरीत्या कमी होते. किवीमधील अँटीऑक्सिडंट्स केवळ डीएनएला फ्री रॅडिकल्सपासून वाचवत नाहीत, तर खराब झालेल्या डीएनएची दुरुस्ती करण्याची क्षमताही वाढवतात.
ग्रीन टी प्या
ग्रीन टीमध्ये एपिगॅलोकेटचिन-३-गॅलेट (EGCG) नावाचे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असते, जे ट्यूमरपासून संरक्षण करण्यास मदत करते. त्याच्या नियमित सेवनाने भविष्यात कर्करोग होण्याचा धोका कमी होऊ शकतो.

बीन्स खा
कडधान्ये ही प्रथिने आणि उच्च फायबर या दोन्हींचा चांगला स्रोत आहेत, जी अनेक स्तरांवर शरीराचे संरक्षण करतात. अर्धा कप कडधान्यांमध्ये अंदाजे सात-आठ ग्रॅम फायबर असते. बहुतेक प्रौढांना दररोज २५-३८ ग्रॅम फायबरची आवश्यकता असली तरी कडधान्यांचे थोडेसे सेवन आपली दैनंदिन गरज सहज पूर्ण करते. जास्त फायबरच्या सेवनाने कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका कमी होतो. कडधान्यांच्या सेवनाने आतड्यातील सूक्ष्मजीवांचे पोषण होते आणि मोठे आतडे निरोगी राहते.
