scorecardresearch

३१ लाखांची भेट आणि ती ही पराभूत उमेदवाराला! सरपंचपदाची निवडणूक हरलेल्याचा गावकऱ्यांकडून विशेष सत्कार, कारण…

गावकऱ्यांनी हा निधी गोळा करुन या उमेदवाराला दिला जो केवळ १५७ मतांनी ते पराभूत झाला

३१ लाखांची भेट आणि ती ही पराभूत उमेदवाराला! सरपंचपदाची निवडणूक हरलेल्याचा गावकऱ्यांकडून विशेष सत्कार, कारण…
गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारामुळे ते भारावून गेले (फोटो सोशल मीडियावरुन)

Candidate Who Lost Sarpanch Polls Gifted Rs 31 Lakh By Villagers: निवडणूक म्हटल्यावर जय-परायजय हा आलाच. विजयी होणाऱ्या उमेदवाराला सत्तेबरोबरच प्रसिद्धीही मिळते. मात्र त्याचबरोबर त्यांच्या खांद्यावर जबाबदारीही पडते. मात्र दुसऱ्याबाजूला पराभूत झालेल्या उमेदवाराच्या पदरी निराशा पडते आणि त्याला फारचं महत्त्व दिलं जात नाही. मात्र हरियाणामधील एका गावाने चक्क पराभूत व्यक्तीचा सत्कार केला आहे. विशेष म्हणजे सरपंचपदाची निवडणूक हरलेल्या व्यक्तीचा गावकऱ्यांनी सत्कार केला.

हिसारमधील बुधा खेरा गावातील सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये उभ्या असलेल्या या पराभूत उमेदवाराचा गावकऱ्यांनी एकत्र येऊन सत्कार केला. निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतरही सत्कार झालेला हा या गावातील पहिलाच उमेदवार असल्याचं सांगितलं जातं. केवळ सत्कार नाही तर या गावकऱ्यांनी तब्बल ३१ लाख ३१ हजार रुपयांची रक्कमही या उमेदवाराला भेट म्हणून दिली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान या उमेदवाराने मांडलेले मुद्दे आणि एकंरदितच त्याने गावासंदर्भात घेतलेल्या भूमिकाचा सन्मान करण्याच्या दृष्टीने हे सारं करण्यात आल्याचं गावकरी सांगतात.

सुभाष नांबरदार असं या अमेदवाराचं नाव आहे. गावामध्ये बंधुभाव आणि एकोपा वाढावा यासाठी सुभाष यांनी बरेच प्रयत्न केले. ते सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये सुखविंदर बाधू यांच्याविरोधात उभे होते. केवळ १५७ मतांनी ते पराभूत झाले. मात्र सुभाष यांच्या पराभवानंतरही गावकऱ्यांनी एकत्र येत एका विशेष कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला. योग्य वेळी योग्य भूमिका घेऊन गावातील एकोपा वाढवण्यासाठी आणि गावाच्या भल्यासाठी सुभाष यांनी केलेल्या प्रयत्नांची जाण ठेऊन गावकऱ्यांनी त्यांच्यासाठी गोळा गेलेला निधी यावेळी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

नक्की वाचा >> वाहन चालक ते ३३ कोटींचा मालक… बॉसशी गप्पा मारता मारता बदललं दुबईमधील ३१ वर्षीय भारतीय तरुणाचं नशीब

गावचे माजी सरपंच समशेर कारवासरा यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुभाष हे समाजासाठी काम करणारे व्यक्तीमत्व असल्याचं सांगितलं. मागील अनेक वर्षांपासून ते समाजिक कामांमध्ये सक्रीयपणे सहभाग घेतात असंही समशेर यांनी सांगितलं. “त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि निवडणुकीत पराभूत झाले असले तरी ते आमचे हिरो आहेत हे सांगण्याच्या दृष्टीने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आम्ही त्यांना या पराभवाने खचून जाऊ नका असं कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला,” असं समशेर म्हणतात.

नक्की वाचा >> ‘ट्रम्प वॉल’ ओलांडण्याच्या नादात गुजराती व्यक्तीचा मृत्यू! घुसखोरीच्या प्रयत्नात मृत व्यक्तीची पत्नी भिंतीवरुन अमेरिकन प्रांतात पडली

या सत्कारामुळे सुभाष भारावून गेले असून त्यांनी गावकऱ्यांचे आभार मानले आहेत. “गावकऱ्यांनी माझ्याबद्दल दाखवल्याबद्दल प्रेमासाठी मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. मी विजयी उमेदवाशी कोणतेही मतभेद ठेवणार नाही,” असं सुभाष सत्कारानंतर म्हणाले. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी दिलेल्या या पैशांमधून गावासाठीच काम करण्याचा सुभाष यांचा विचार आहे. या पैशांमधून मी तरुणांना खेळाचं साहित्य आणि पुस्तकांचा वाटप करणार आहे. तसेच या पैशांमधून गावातील काही रस्त्यांची डागडुजी करुन घेणं आणि पाण्याच्या टाक्या बांधण्याचं काम केलं जाईल असं सुभाष म्हणाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-12-2022 at 12:30 IST

संबंधित बातम्या