Chanakya Niti Quotes: प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात सुख, शांती आणि यश हवं असतं. मात्र कित्येकदा कळत नकळत घडणाऱ्या चुका त्रासाला कारणीभूत ठरतात. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात मानवी आयुष्य सुखकर करणाऱ्या अनेक गोष्टींचा आणि धोरणांचा उल्लेख केला आहे. ही धोरणे प्रासंगिक आणि व्यावहारिक देखील आहेत. चाणक्य सांगतात की, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेकदा अशी परिस्थिती येते की त्यामुळे जीवन खूप कठीण आणि कष्टदायी होते. चाणक्यांच्या मते, व्यक्तीच्या जीवनातील काही ठराविक ३ परिस्थिती या अतिशय वेदनादायक मानल्या जातात…
चाणक्यांचा श्लोक
कष्टं च खलु मूर्खत्व कष्टं च खलु यौवनम्
कष्टात् कष्टतरं चैव परगेहे निवासनम्
या श्लोकाचा अर्थ असा आहे की, मूर्खपणा म्हणजेच ज्ञानी नसणे हे दु:खदायक आहे. स्वत:चे घर असूनही इतरांच्या घरात राहणे सर्वात वेदनादायक मानले गेले आहे.
मूर्खपणा किंवा अज्ञान
ज्ञानाचा अभाव किंवा मूर्खपणा हे माणसाच्या आयुष्यातील मोठे दु:ख मानले जाते. ज्ञानाच्या अभावी मनुष्य आयुष्यभर वारंवार चुका आणि अडखळत राहतो. चाणक्यांचा विश्वास आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे पुरेशी माहिती किंवा समज नसते तेव्हा तो योग्य निर्णय घेण्यास असमर्थ असतो. चाणक्य सांगतात की, माणसाचे ज्ञानी असणे फार महत्त्वाचे आहे. अभ्यासाव्यतिरिक्त नातेसंबंध, पैसा आणि व्यवसायाचे ज्ञान किंवा समज असल्याशिवाय चांगले निर्णय घेता येत नाहीत. आपल्या चुकांमधून न शिकणे हेदेखील अज्ञानाच्या कक्षेत येते.
तारूण्यात भरकटणे
चाणक्य सांगतात की, तारूण्य हा ऊर्जा, उत्साह आणि संधीचा काळ असतो. तरूणाईमध्ये खूप उत्साह आणि ऊर्जा असते, पण जर विवेक आणि संयम नसेल तर माणूस भरकटतो आणि स्वत:चे नुकसान करतो. तरूणपणी संयम आवश्यक असतो. तरूणपणी माणसाला काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्याची तीव्र इच्छा असते आणि धोका पत्करण्याचे धैर्य असते. पण राग, घाई, भावनेने निर्णय घेणे आणि परिणामांचा विचार न करता पावले उचलणेही नुकसान करू शकते.
स्वत:चे घर असतानाही दुसऱ्याच्या घरात राहणे
चाणक्य सांगतात की, मूर्खपणा आणि संयम नसलेले तारूण्य हे वेदनादायक असू शकतेच, पण एखाद्याच्या आश्रयाला किंवा परक्या व्यक्तीच्या घरात राहणे हे सर्वात मोठे दु:ख आहे. चाणक्यांच्या धोरणांनुसार, माणूस दुसऱ्याच्या घरी मुक्तपणे जीवन जगू शकत नाही. त्याच्या मनात सतत एक भीती असते. दुसऱ्याच्या घरात व्यक्तीला त्या घरातील सदस्यांशी आणि परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. अशआ परिस्थितीत त्या व्यक्तीला मानसिक तणाव किंवा दबाव जाणवू शकतो. म्हणूनच चाणक्य सांगतात की दुसऱ्याच्या घरात राहणे वेदनादायक आहे.
