Chanakya Niti : आचार्य चाणक्य त्या काळातील सर्वांत मोठे विद्वान आणि ज्ञानी पुरुष म्हणून ओळखले जातात. जर कोणत्याही माणसाला सुखी, समृद्ध आणि सन्मानजनक आयुष्य जगायचे असेल, तर त्याने चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टींचे जीवनात पालन केले पाहिजे. आचार्य चाणक्य यांनी शतकांपूर्वी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्यांनाच आज आपण ‘चाणक्य नीती’ म्हणून ओळखतो. त्यांच्या या गोष्टी आजही मानवजातीला योग्य मार्ग दाखवण्याचे काम करीत आहेत.
चाणक्य नीतीमध्ये त्यांनी स्वच्छ आणि सरळ मनाच्या लोकांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. सरळ आणि चांगल्या माणसांच्या काही सवयीच पुढे त्यांच्या सर्वांत मोठ्या कमकुवत बाजू बनतात,असे चाणक्य यांचे नेहमीच मानणे होते. आजच्या या लेखात आपण चांगल्या माणसांच्या याच सवयींबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
१. गरजेपेक्षा जास्त सरळ आणि भोळे असणे
आचार्य चाणक्य यांच्या मते, चांगल्या माणसाची सर्वांत मोठी कमजोरी म्हणजे त्याचे गरजेपेक्षा जास्त सरळ आणि भोळे असणे. चाणक्य यांनी ही गोष्ट समजावून सांगण्यासाठी एक खूप सोपे उदाहरण दिले आहे. ते म्हणतात, जेव्हा एखादी व्यक्ती जंगलात लाकूड तोडायला जाते, तेव्हा ती सर्वांत आधी सरळ वाढलेली झाडेच कापते. जी झाडे वाकडीतिकडी असतात, त्यांना ती हातही लावत नाही. अगदी त्याचप्रमाणे आजच्या जगात जे लोक खूप भोळे आणि सरळ असतात, हुशार व चलाख लोक सर्वांत आधी त्यांचाच गैरफायदा घेतात.
२. प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवणे
चांगल्या आणि सरळ लोकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते मनाने खूप साफ असतात आणि ते कधीही कोणाचे वाईट चिंतत नाहीत; पण त्यांची हीच चांगली सवय त्यांच्यासाठी सर्वांत मोठी समस्या ठरते. आपण जसे खरे आणि चांगले आहोत, तसेच बाकीचे सगळे लोकही चांगलेच असतील, असे त्यांना वाटते. चाणक्य यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीवर विचार न करता, विश्वास ठेवणे ही त्यांची सर्वांत मोठी मूर्खपणाची गोष्ट ठरते. जेव्हा तुम्ही प्रत्येकावर सहज विश्वास ठेवता, तेव्हा लोक तुमच्या याच सरळपणाचा फायदा घेऊन तुम्हाला फसवतात.
३. कोणालाही ‘नाही’ न म्हणू शकणे
चांगल्या लोकांची आणखी एक मोठी कमजोरी म्हणजे त्यांना कोणाचेही मन दुखवायचे नसते. याच कारणामुळे ते कधीही कोणाला नकार देऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे स्वतःसाठी वेळ नसला किंवा दुसऱ्यांचे काम केल्याने स्वतःचे नुकसान होणार असले तरीही ते इतरांना मदत करण्यासाठी ‘हो’ म्हणतात. चाणक्य नीतीनुसार, प्रत्येक गोष्टीला ‘हो’ म्हणणे म्हणजे स्वतःलाच संकटात टाकण्यासारखे आहे. जर तुम्ही योग्य वेळी ‘नाही’ म्हणायला शिकला नाहीत, तर लोक तुम्हाला गृहीत धरू लागतील आणि फक्त तुमचा वापर करून घेतील.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
