Chanakya Niti for Good People : आचार्य चाणक्य यांना त्यांच्या काळातील सर्वांत मोठे विद्वान आणि ज्ञानी पुरुष म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते की, जर कोणत्याही माणसाला सुखी, समृद्ध आणि सन्मानजनक जीवन जगायचे असेल, तर त्याने चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टींचा आपल्या जीवनात वापर करायला हवा. आचार्य चाणक्य यांनी शतकांपूर्वी ज्या गोष्टी मांडल्या होत्या, त्यांनाच आज आपण ‘चाणक्य नीती’ म्हणून ओळखतो. त्यांचे हेच विचार आजही व्यक्तीला योग्य मार्ग दाखवण्याचे काम करीत आहेत.

चाणक्य नीतींमध्ये चाणक्य यांनी निष्पाप आणि चांगल्या मनाच्या लोकांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या व्यक्ती मनापासून चांगल्या आणि सरळ असतात, त्यांच्या काही सवयीच पुढे जाऊन, त्यांची सर्वांत मोठी कमजोरी बनतात, असे चाणक्य यांचे नेहमीच मानणे होते. त्यामुळे साध्या आणि चांगल्या मनाच्या लोकांच्या याच सवयींबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

१. गरजेपेक्षा भोळे असणे

आचार्य चाणक्य यांच्या मते, चांगल्या माणसाची सर्वांत मोठी कमजोरी म्हणजे त्याचे गरजेपेक्षा जास्त सरळ आणि भोळे असणे. चाणक्य यांनी ही गोष्ट समजावण्यासाठी एक खूप सोपे उदाहरण दिले आहे. ते म्हणतात की, जेव्हा एखादी व्यक्ती जंगलात लाकूड तोडायला जाते, तेव्हा ती सर्वांत आधी सरळ वाढलेल्या झाडांवरच कुऱ्हाड चालवते. जी झाडे वाकडी-तिकडी असतात, त्यांना ती हातही लावत नाहीत आणि तशीच सोडून देते. अगदी याचप्रमाणे, आजच्या जगात जे लोक खूप भोळे आणि सरळ असतात, त्यांचाच चलाख लोक सर्वांत आधी गैरफायदा घेतात.

२. प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवणे

चांगल्या आणि साध्या लोकांचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते मनाने खूप साफ असतात आणि कधीही कोणाचे वाईट चिंतत नाहीत; पण त्यांची हीच चांगली वृत्ती त्यांची सर्वांत मोठी समस्या बनते. आपण जसे सच्चे आहोत, तसेच बाकी सगळे लोकही चांगलेच असतील, असे त्यांना वाटत राहते. चाणक्य यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीवर विचार न करता, विश्वास ठेवणे ही त्यांची सर्वांत मोठी चूक ठरते. जेव्हा तुम्ही प्रत्येकावर सहजासहजी विश्वास ठेवता, तेव्हा लोक तुमच्या याच सरळपणाचा फायदा घेऊन तुम्हाला फसवतात.

३. कोणालाही ‘नाही’ म्हणता न येणे

ज्या व्यक्ती चांगल्या आणि साध्या मनाच्या असतात, त्यांची आणखी एक मोठी कमजोरी म्हणजे त्यांना कोणाचेही मन दुखवायचे नसते. याच कारणामुळे त्या कोणालाही कधी ‘नाही’ म्हणू शकत नाहीत. स्वतःकडे वेळ नसला किंवा दुसऱ्याची मदत करताना स्वतःचे नुकसान होत असले तरीही हे लोक इतरांना मदत करण्यासाठी ‘हो’ म्हणतात. चाणक्य नीतीनुसार, प्रत्येक गोष्टीला होकार देणे म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. जर तुम्ही योग्य वेळी ‘नाही’ म्हणायल शिकला नाहीत, तर लोक तुम्हाला गृहीत धरू लागतील आणि फक्त तुमचा वापर करून घेतील.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)