Chanakya Niti : आचार्य चाणक्य जगातील महान विद्वानांपैकी एक मानले जातात. आजही त्यांच्या ज्ञानाची आणि चातुर्याची प्रशंसा केली जाते. आपला अनुभव, ज्ञान आणि बुद्धिमत्ता वापरून, आचार्य चाणक्यांनी जीवनात यश मिळवण्यासाठी अनेक श्लोक लिहिले आहेत, ज्यांना आजही प्रचंड महत्त्व आहे. त्यांच्या श्लोकांना समजून घेऊन त्यांचे पालन केल्याने जीवनातील अनेक समस्या सुटू शकतात. तर आचार्य चाणक्यांनी अशा काही लोकांचा उल्लेख केला आहे, ज्यांच्यापासून नेहमी सावध राहिले पाहिजे. चला, आपण अशा लोकांच्या प्रकारांबद्दल जाणून घेऊया ज्यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजे…
कवींपासून सावध राहा
कवी आपल्या कवितांमधून मनातील विचार प्रभावीपणे मांडू शकतात. त्यांच्या शब्दांमधून ते एखाद्या गोष्टीचे कौतुकही करू शकतात आणि टीकाही करू शकतात. त्यामुळे कवीशी मैत्री करताना किंवा त्यांच्याशी मतभेद असताना विचारपूर्वक वागावे, असे चाणक्य सांगतात.
व्यसन असणाऱ्या व्यक्तीशी मैत्री करू नका
चाणक्यांच्या मते, सतत मद्यपान पिणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहणे योग्य आहे. कारण मद्यपानाच्या नशेत व्यक्ती अनेकदा काय बोलावे आणि काय बोलू नये, याचे भान विसरते. अशा वेळी ती कोणालाही वाईट वाटेल असे शब्द बोलू शकते किंवा चुकीचे वागू शकते. त्यामुळे अशा व्यक्तीशी मैत्री करताना सावध राहावे.
स्वार्थी व्यक्तीपासून दूर राहा
स्वार्थी व्यक्ती नेहमी स्वतःचा फायदा कसा होईल, याचा विचार करते. स्वतःचे काम करून घेण्यासाठी अशी व्यक्ती इतरांचा वापर करू शकते किंवा त्यांची फसवणूकही करू शकते. त्यामुळे अशा लोकांवर लगेच विश्वास ठेवू नये आणि त्यांच्याशी व्यवहार करताना काळजी घ्यावी, असे चाणक्य सांगतात.
