Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात जीवन यशस्वी करण्यासाठी अनेक महत्त्वाची तत्त्वे सांगितली आहेत. त्यांनी हेही सांगितले आहे की, माणसाच्या संगतीचा त्याच्या भविष्यात आणि स्वभावावर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे चाणक्यांनी अशा काही लोकांचा उल्लेख केला आहे, ज्यांच्यापासून नेहमी दूर राहावे.
त्यांच्या मते, अशा लोकांची साथ आयुष्यात अडचणी, अपयश आणि तणावाचे कारण ठरू शकते. अशा लोकांशी जास्त जवळीक ठेवल्यास मानसिक, सामाजिक आणि आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते. चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मूर्ख व्यक्तीपासून दूर राहा
आचार्य चाणक्यांच्या मते, मूर्ख व्यक्तीची संगत कधीही फायद्याची नसते. अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे. चाणक्य नीतीनुसार, अशी व्यक्ती विचार न करता निर्णय घेते आणि अनेकदा चुकीचा सल्ला देते. तसेच आपल्या विचारांमुळे आणि निर्णयांमुळे जवळच्या लोकांनाही अडचणीत टाकते. असेही म्हटले जाते की, मूर्ख लोक अनेकदा आयुष्यातील तणावाचे मोठे कारण ठरतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणेच योग्य मानले जाते.
इतरांची निंदा आणि बदनामी करणाऱ्यांपासून सावध राहा
चाणक्य नीतीनुसार, जे लोक सतत इतरांची टीका करत असतात, त्यांच्यापासून दूर राहणेच चांगले असते. असे लोक मत्सर आणि द्वेषाच्या भावनेतून इतरांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात. आचार्य चाणक्यांच्या मते, जो व्यक्ती आज दुसऱ्याची निंदा करतो, तो उद्या तुमच्याबद्दलही तसेच बोलू शकतो. त्यामुळे अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नये.
दुष्ट स्वभावाच्या व्यक्तींपासून अंतर ठेवा
आचार्य चाणक्यांच्या मते, दुष्ट स्वभावाचे लोक सर्वात जास्त धोकादायक असतात. असे लोक स्वतःच्या फायद्यासाठी कोणाचाही विश्वासघात करू शकतात. तसेच गरज पडल्यास ते तुमची गुपिते उघड करू शकतात आणि कठीण काळात साथही सोडू शकतात. बाहेरून ते मैत्रीचे नाटक करत असले तरी त्यांच्या मनात फसवणूक आणि कपट लपलेले असू शकते. त्यामुळे अशा लोकांना ओळखून योग्य वेळी त्यांच्यापासून दूर राहणेच शहाणपणाचे ठरते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
