Identify Fake and Two Faced People : प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. काही लोक मनातलं स्पष्टपणे बोलतात, तर काही जण आपल्या भावना मनातच ठेवतात. काही लोक मात्र तुमच्यासमोर इतकं गोड बोलतात की, जणू काही ते तुमचे सर्वात जवळचे आणि हितचिंतक आहेत. पण, प्रत्यक्षात ते तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलू शकतात किंवा तुमचा विश्वासघात करू शकतात. त्यामुळे प्रत्येकाच्या गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी त्यांच्या कृतीकडेही लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

अशा दुहेरी स्वभावाच्या लोकांना पहिल्याच भेटीत कसे ओळखायचे? यासाठी आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीमध्ये ३ महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत. चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवल्यास समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आणि वागणूक समजून घेण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे एखादी व्यक्ती विश्वास ठेवण्यास योग्य आहे की नाही, हे वेळीच ओळखून तुम्ही योग्य अंतर ठेवू शकता.

प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगू नका

तुमची कमजोरी, आर्थिक परिस्थिती, भविष्यातील योजना किंवा कुटुंबाची वैयक्तिक माहिती प्रत्येकाशी शेअर करणे योग्य नाही. जर अशी माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागली. तर ती व्यक्ती तुमचा गैरफायदा घेऊ शकते. म्हणून, महत्त्वाच्या आणि वैयक्तिक गोष्टी फक्त विश्वासू लोकांशीच शेअर करा. विशेषतः, ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला शंका आहे.

धूर्त आणि कपटी लोकांपासून दूर राहा

जो व्यक्ती वारंवार खोटे बोलतो, इतरांबद्दल वाईट बोलतो, प्रत्येक परिस्थितीत स्वतःचा फायदा पाहतो, अशा व्यक्तीपासून सावध राहा. अशा लोकांना आपली कमजोरी सांगू नका. म्हणून चाणक्य नीती चांगल्या संगतीच्या महत्त्वावर भर देते. तुम्ही ज्या प्रकारच्या लोकांशी मैत्री करता, ते तुमच्या वागणुकीला आणि जीवनातील परिस्थितीला आकार देतात. म्हणून, अशा लोकांची संगत निवडावी ज्यांचे वर्तन प्रामाणिक आणि सकारात्मक असते.

नेहमी सतर्क आणि सावध रहा

काही लोक अती प्रेम दाखवून तुमचा विश्वास जिंकून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा वागणुकीने लगेच प्रभावित होण्याऐवजी, समोरच्या व्यक्तीच्या कृतींकडे लक्ष दिले पाहिजे. सतर्क राहण्याचा अर्थ प्रत्येकावर संशय घेणे असा नाही. याचा अर्थ महत्त्वाच्या बाबतीत घाईचे निर्णय टाळणे आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी परिस्थिती पूर्णपणे समजून घेणे असा होतो. म्हणून, तुमच्या पाठीमागे तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांना टाळण्यासाठी, विवेक आणि सतर्कता राखणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)