4 Things You Should Never Take Lightly : आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टी आजही आपल्या जीवनात उपयोगी पडतात. चाणक्य नीतीमध्ये त्यांनी केवळ पैसा व राजकारण याबद्दलच सांगितले नाही. तर दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक लहान-मोठ्या गोष्टींबद्दलही मार्गदर्शन केले आहे. काही गोष्टी आपल्याला सुरुवातीला लहान किंवा साध्या वाटतात. पण, त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अशा गोष्टी वेळेत ओळखून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

कर्ज

चाणक्य नीतीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतले असेल, तर त्याची वेळेवर परतफेड केली पाहिजे. कर्ज एक वाळवी आहे, जी माणसाची शांती, झोप आणि सन्मान यासह सर्व काही गोष्टी हिरावून घेऊ शकते. म्हणून, कर्ज फेडण्यासाठी मेहनत घेऊन शक्य तितक्या लवकर कर्जमुक्त झाले पाहिजे.

आग

आचार्य चाणक्यांनुसार, आगीच्या एका लहान ठिणगीमध्येही एका क्षणात, एक मोठे जंगल जाळून टाकण्याची शक्ती असते. म्हणून आगीच्या शक्तीला कधीही कमी लेखू नये. आग पूर्णपणे विझल्याची खात्री झाल्याशिवाय ती जागा सोडू नये. कारण, आग धुमसत राहिल्यास ती पुन्हा पेट घेऊ शकते आणि मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आगीच्या बाबतीत कधीही निष्काळजीपणा करू नये.

शत्रू

एखादी व्यक्ती कमकुवत किंवा असहाय्य दिसत असली तरीही तिला कमी लेखू नये. कारण – योग्य संधी मिळाल्यास ती व्यक्तीही आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे कोणाशी वाद किंवा वैर असेल, तर ते वेळेत आणि समजूतदारपणे सोडवण्याचा प्रयत्न करावा. शक्य असल्यास आपापसांत गोष्टी बोलून घ्याव्या किंवा त्या व्यक्तीशी पुन्हा वाद होणार नाही, याची काळजी घेऊन तिच्यापासून दूर राहावे.

आजार

चाणक्य नीतीनुसार, आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. कोणताही आजार लहान असो किंवा मोठा, त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य उपचार करून घेतले पाहिजेत. कारण – सुरुवातीला साधा वाटणारा आजारही वेळेवर उपचार न केल्यास गंभीर होऊ शकतो. त्यामुळे आजार किरकोळ आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष कधीच करू नये.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)