Chanakya Niti on Relationships: चाणक्य नीती आपल्याला आयुष्यात अनेक महत्त्वाचे धडे शिकवते. त्यापैकी एक म्हणजे नातं टिकवणे. चाणक्य म्हणतात नातेसंबंध टिकवताना केवळ प्रेम आणि आपुलकी पुरेशी नसते, तर एकमेकांना समजून घेणे, योग्य वेळी योग्य शब्द बोलणे आणि विश्वास कायम ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असते. चाणक्यांनी आपल्या नीतीशास्त्रात मानवी स्वभाव आणि नात्यांशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आज आम्ही चाणक्य नीतीमधील असे चार श्लोक सांगणार आहोत, जे नात्यांमधील गैरसमज दूर करण्यास आणि परस्परांमध्ये विश्वास व आपुलकी वाढवण्यास मदत करू शकतात. चला, चाणक्य नीतीमधील हे श्लोक आणि त्यामागचा अर्थ जाणून घेऊया, जे तुमच्या नात्यांमध्ये अधिक गोडवा आणू शकतात.

१. केवळ सौंदर्याकडे पाहू नका

रूपयौवनसम्पन्ना विशालकुलसम्भवाः।
विद्याहीना न शोभन्ते निर्गन्धा इव किंशुकाः ॥

या श्लोकात, आचार्य चाणक्य म्हणतात की, सौंदर्य, तारुण्य आणि उच्च कुळात जन्म घेऊनही, जर एखाद्या व्यक्तीमध्ये ज्ञानाची कमतरता असेल. तर ती व्यक्ती सुगंध नसलेल्या सुंदर फुलासारखी निरुपयोगी आणि अयोग्य आहे. म्हणून, जोडीदार निवडताना हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, केवळ बाह्य सौंदर्य सर्वस्व नाही; त्या व्यक्तीचा स्वभाव आणि गुण यांचाही विचार केला पाहिजे.

२. देवी लक्ष्मी येथे वास करते

मूर्खाः यत्र न पूज्यन्ते धान्यं यत्र सुसंचितम् ।
दाम्पत्योः कलहो नास्ति तत्र श्री स्वयमागता॥

चाणक्य नीतीच्या या श्लोकात असे म्हटले आहे की, ज्या ठिकाणी किंवा घरात मूर्खांचा आदर केला जात नाही, जिथे धान्य व्यवस्थित साठवले जाते आणि जिथे पती-पत्नीमध्ये भांडणे होत नाहीत, तिथे देवी लक्ष्मी वास करते आणि जीवनात सुख-समृद्धी आपोआपच येते.

३. तरच नाती टिकतात

माता यस्य गृहे नास्ति भार्या चाप्रियवादिनी।
अरण्यं तेन गन्तव्यं यथारण्यं तथा गृहम् ॥

या श्लोकाचा अर्थ असा आहे की, ज्या व्यक्तीच्या घरात आई किंवा प्रियावदिनी (जोडीदार) कोणीही नाही, त्याच्यासाठी घर आणि वन दोन्ही सारखेच आहेत. चाणक्यांच्या मते, नात्यात प्रेम, आपुलकी आणि गोडवा असणे महत्त्वाचे आहे. जोडीदाराने एकमेकांशी प्रेमाने आणि आपुलकीने संवाद साधल्यास नात्यातील जवळीक वाढण्यास मदत होते. त्यामुळे सुखी आणि निरोगी नातेसंबंधासाठी प्रेमळ संवाद आणि परस्पर समजूतदारपणा महत्त्वाची भूमिका बजावतात.

४. तुमचा सगळ्यात चांगला मित्र कोण?

विद्या मित्रं प्रवासेषु भार्या मित्रं गृहेषु च।
व्याधितस्यौषधं मित्रं धर्मो मित्रं मृतस्य च॥

चाणक्य या श्लोकातून सांगतात की, ज्याप्रमाणे एखाद्या रुग्णासाठी औषध हे सर्वात चांगले मित्र ठरते. त्याचप्रमाणे जीवनसाथी हा आपल्या आयुष्यातील विश्वासू बरोबर असतो. सुख असो वा दुःख, चांगली परिस्थिती असो वा कठीण काळ, जीवनसाथी अनेक प्रसंगी आपल्याला साथ देतो. त्यामुळे नात्यात प्रेमासोबतच एकमेकांबद्दल आदर, विश्वास आणि आपुलकी असणेही महत्त्वाचे आहे. चाणक्यांच्या या शिकवणीनुसार, आपल्या जीवनसाथीचा नेहमी आदर करावा आणि नात्यात परस्परांचा मान राखावा.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)