Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नीती माणसाला कठीण परिस्थिती आणि अडचणींमधून सहजपणे बाहेर पडण्याचे धैर्य देतात. असे म्हटले जाते की, चाणक्य यांच्या नीती आचरणात आणणे थोडे कठीण असते; पण ज्याने या नीती आपल्या जीवनात स्वीकारल्या, त्याला यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
एका नीतीमध्ये चाणक्य यांनी सांगितले आहे की, कोणत्या परिस्थितीत किंवा प्रसंगी व्यक्तीने लाजण्याऐवजी धैर्य दाखवले पाहिजे. चाणक्य यांच्या मते, जिथे लाज किंवा नम्रता आवश्यक आहे, तिथे व्यक्तीने नम्र राहावे आणि जिथे धैर्य दाखवण्याची गरज आहे, तिथे धैर्य दाखवण्यात काहीही गैर नाही. जाणून घ्या, चाणक्य नीतीनुसार कोणत्या परिस्थितीत व्यक्तीने लाज किंवा संकोच सोडून धैर्य दाखवले पाहिजे.
श्लोक:
धनधान्यप्रयोगेषु विद्यासंग्रहणेषु च।
आहारे व्यवहारे च त्यक्तलज्जः सुखी भवेत्॥
श्लोकाचा सोपा अर्थ
चाणक्य यांच्या मते, जो व्यक्ती धन आणि धान्याच्या वापरात किंवा देवाणघेवाणीत, ज्ञान मिळवताना, जेवताना आणि इतरांशी व्यवहार करताना लाज किंवा संकोच सोडतो, तोच जीवनात नेहमी सुखी राहतो.
श्लोकाचं सार
धन आणि धान्याच्या व्यवहारात
चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने आपले दिलेले पैसे परत मागताना, व्यवसायातील कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना, पगाराबाबत बोलताना किंवा आपण दिलेल्या पैशांचा हिशोब मागताना कधीही संकोच किंवा लाज बाळगू नये. अशा वेळी संकोच किंवा लाज केल्यास थेट आर्थिक नुकसान होऊ शकते.
विद्या किंवा ज्ञान मिळवताना
चाणक्य यांच्या मते, काही शिकताना आपल्या मनात निर्माण झालेले प्रश्न विचारण्यास किंवा त्यांची उत्तरे जाणून घेण्यास कधीही संकोच करू नये. ज्ञान कोणाकडूनही मिळू शकते, मग ती व्यक्ती वयाने आपल्यापेक्षा लहान असो किंवा मोठी, तसेच तिचे पद आपल्यापेक्षा मोठे असो किंवा छोटे. शिक्षक किंवा ज्ञानी व्यक्तीला मोकळेपणाने प्रश्न विचारणारी व्यक्तीच खरे ज्ञान मिळवू शकते. गुरुंना प्रश्न न विचारणे किंवा आपल्या शंकांचे निरसन न केल्यामुळे प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो.
आहार म्हणजेच भोजन करताना
चाणक्य यांच्या मते, मित्र असो, जवळची व्यक्ती असो किंवा नातेवाईक, कोणाच्याही समोर जेवताना संकोच करू नये. जेवताना कधीही आपली भूक दाबू नये. लोक काय म्हणतील किंवा लाज वाटेल म्हणून कमी जेवल्यास त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
आपल्या बोलण्यात आणि व्यवहारात
चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने आपले मत स्पष्टपणे आणि न घाबरता मांडले पाहिजे. आपल्या नातेसंबंधांमध्ये आणि इतरांशी व्यवहार करताना स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे बोलणारी व्यक्ती नेहमी तणावमुक्त आणि सुखी राहते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
