Chanakya Niti Tips : आचार्य चाणक्यांची तत्त्वे जीवनात अंगीकारल्याने यशाचा मार्ग मोकळा होतो आणि समाजात मान-सन्मान मिळतो. तसेच जीवनात सुख आणि शांती सुद्धा टिकून राहते. म्हणूनच, चाणक्य नीती आजही प्रासंगिक आणि महत्त्वपूर्ण मानली जाते. चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की, काही नातेवाईक आणि मित्रांचा स्वभाव सापाच्या विषापेक्षाही अधिक धोकादायक असतो. असे मानले जाते की, अशा लोकांच्या बरोबर राहिल्याने जीवनात मोठे नुकसान होऊ शकते. चला आपण अशा धोकादायक लोकांना कसे ओळखायचे हे जाणून घेऊया.

नातेवाईक हे आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतात. सुख-दुःखाच्या प्रसंगी अनेकदा त्यांची साथ मिळते. मात्र प्रत्येक नातं, प्रत्येक जण मनापासून जपेल असं नाही. काही नातेवाईक गोड बोलतात, जवळचे असल्याचे भासवतात; पण त्यांच्या वागण्यात स्वार्थ दडलेला असू शकतो. अशा व्यक्तींमुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण होण्याबरोबर मानसिक शांतताही बिघडू शकते. त्यामुळे नातेवाईकांमधील अशा व्यक्तींची काही लक्षणे वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे.

खोटे बोलणारे

आचार्य चाणक्य म्हणतात की, खोटे बोलणाऱ्या नातेवाईकांवर कधीही विश्वास ठेवू नये. अशा लोकांवर विश्वास ठेवल्यास जीवनात विश्वासघात होऊ शकतो. म्हणूनच, अशा लोकांपासून सुरक्षित अंतर राखणे नेहमीच फायदेशीर ठरू शकते.

अति राग

काही लोक छोट्या-छोट्या गोष्टींवरून पटकन रागावतात आणि रागाच्या भरात नको ते बोलून जातात. त्यामुळे अशा लोकांपासून थोडे अंतर ठेवणे योग्य ठरते. हे लोक अनेकदा विचार न करता बोलतात किंवा वागतात. त्यांच्या चुकीच्या शब्दांमुळे किंवा वागण्यामुळे जवळची नातीही कायमची खराब होऊ शकतात.

स्वार्थी

आचार्य चाणक्यांच्या नीतीनुसार, स्वार्थी नातेवाईक केवळ स्वतःचे हित साधले जाईपर्यंतच नातेसंबंध टिकवतात. एकदा त्यांचे काम झाले की, ते तुमच्यापासून दूर जातात. असे लोक स्वतःच्या फायद्यासाठी कधीही तुमचा विश्वासघात करू शकतात. म्हणून, स्वार्थी नातेवाईकांपासून वेळेवर दूर राहणे फायद्याचे ठरते.

दुसऱ्यांच्या मालमत्तेवर नजर ठेवणे

काही नातेवाईकांना दुसऱ्यांच्या मालमत्तेचा सतत लोभ असतो. अशा व्यक्ती इतरांच्या संपत्तीवर वाईट नजर ठेवू शकतात आणि त्यासाठी जवळच्या व्यक्तींचेही नुकसान करू शकतात. त्यामुळे अशा लोभी व्यक्तींवर विश्वास ठेवताना सावध राहणे गरजेचे आहे.

संकटात साथ सोडणारे

संकटाचा काळ ही नात्यांची खरी कसोटी असते. संकटाच्या वेळी मदत करण्याऐवजी पाठ फिरवणाऱ्या नातेवाईकांना टाळावे. असे लोक चांगल्या आणि आनंदी परिस्थितीत नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात. पण, संकटाची वेळ येताच ते सर्वात आधी तुमच्यापासून दूर जातात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)