Chanakya Niti : कौटुंबिक आयुष्य असो, मैत्री असो की नोकरी-व्यवसाय, समाजात दीर्घकाळ आपला प्रभाव तेच लोक टिकवून ठेवतात ज्यांचा स्वभाव खंबीर आणि विचार पॉझिटिव्ह असतात. चला तर मग जाणून घेऊया आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या अशा ५ खास गुणांबद्दल, जे कोणत्याही महिलेला खऱ्या अर्थाने आदर आणि ओळख मिळवून देतात…
महिलांचे ‘ते’ ५ अमूल्य गुण (Chanakya Niti For Women)
१. भावनांवर नियंत्रण (भावनिक संतुलन)
आचार्य चाणक्यांच्या मते, जेव्हा माणूस भावनेच्या भरात वाहून जातो, तेव्हा त्याचे निर्णय चुकतात. जी महिला कठीण किंवा तणावाच्या काळात स्वतःवर ताबा ठेवू शकत नाही, तिच्याकडून चुकीचे निर्णय घेतले जातात. यामुळे नातेसंबंध आणि घरातील सुख-शांती बिघडू शकते. भावनांवर नियंत्रण ठेवणे म्हणजे त्या दाबून टाकणे नव्हे, तर राग, भीती किंवा असुरक्षिततेमुळे स्वतःचे नुकसान न करून घेणे होय. शांत डोकं नेहमी स्वाभिमान जपतो आणि नात्यांमधील मोठे वाद रोखतो.
२. विचार करून बोलण्याची सवय (शब्दांचे भान)
विचार न करता बोललेले शब्द माणसाची कमजोरी दाखवून देतात. कधीकधी चुकीचा एक शब्दही अनेक वर्षांची मेहनत आणि कमावलेली इज्जत मातीत मिळवू शकतो. सुज्ञ महिला नेहमी वेळ, प्रसंग आणि समोरच्या व्यक्तीचा विचार करून बोलते. ती विनाकारण किंवा फक्त दाखवण्यासाठी बोलत नाही. योग्य वेळी शांत राहणे हे मोठ्या वादापेक्षा कधीही चांगले असते. जे लोक कमी आणि विचार करून बोलतात, त्यांच्या शब्दाला समाजात जास्त मान मिळतो.
३. खंबीर चारित्र्य (मजबूत संकल्प)
माणसाच्या चारित्र्याची खरी परीक्षा सुखाच्या दिवसांत नाही, तर संकटाच्या काळात होते. जेव्हा परिस्थिती चांगली असते, तेव्हा सगळेच चांगले वागतात. पण जेव्हा स्वतःचे नुकसान होत असते किंवा एखादा मोठा मोह समोर येतो, तेव्हा माणूस कसा वागतो यावरून त्याचे चारित्र्य कळते. खंबीर चारित्र्य असलेली महिला कोणत्याही दबावाखाली किंवा मोहामध्ये आपले विचार आणि नियम बदलत नाही. अशा महिलांवर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात.
४. आत्मसन्मान (स्वाभिमान)
चाणक्यांच्या मते, स्वाभिमान हाच माणसाच्या आदराचा पाया आहे. स्वाभिमानाशिवाय सौंदर्य आणि बुद्धिमत्ता दोन्ही फिके पडतात. स्वाभिमानी महिला स्वतःची किंमत जाणते. ती फक्त नाते टिकवण्यासाठी किंवा लोकांमध्ये राहण्यासाठी स्वतःचा अपमान सहन करत नाही. तिला स्वतःच्या मर्यादा ठाऊक असतात आणि चुकीच्या गोष्टींना ‘नाही’ म्हणताना तिला भीती वाटत नाही. जो स्वतःचा आदर करतो, त्यालाच जग आदर देते.
५. दूरदृष्टी (दीर्घकालीन विचार)
दूरचा विचार करणे हा माणसाचा सर्वात मोठा गुण आहे. एक सुज्ञ महिला कोणत्याही तात्पुरत्या आनंदासाठी किंवा रागाच्या भरात येऊन आयुष्यातील मोठे निर्णय घेत नाही. आपला आजचा निर्णय भविष्यावर, मुलांवर किंवा कुटुंबावर काय परिणाम करेल, याचा ती आधीच विचार करते. हाच विचार पैशांचे नुकसान, नात्यांमधील दुरावा आणि भविष्यातील संकटांपासून वाचवतो. क्षणिक सुखापेक्षा दूरचा विचार करणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
