Chanakya Niti For Success : प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी स्वतःच्या निर्णयाचा पश्चात्ताप होतो. कधी घाईगडबडीत घेतलेला निर्णय अडचणीचा ठरतो, तर कधी कोणावर तरी गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवणे महागात पडते. अनेकदा आपण असा विचार करतो की, आधी थोडा विचार केला असता तर कदाचित परिस्थिती वेगळी असती! अशा वेळी आचार्य चाणक्यांच्या नीती आजही तितक्याच प्रासंगिक वाटतात, जितक्या त्या शतकांपूर्वी होत्या. त्यांनी केवळ राजकारण किंवा प्रशासनाबद्दलच सांगितले नाही, तर मानवी व्यवहार, नातेसंबंध, निर्णयक्षमता आणि जीवन अधिक उत्तम बनवण्यासाठीही अनेक महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.

चाणक्यांच्या मते, योग्य वेळी योग्य निर्णय घेणारी व्यक्तीच यश आणि सन्मान दोन्ही प्राप्त करते. जर तुमचीही अशी इच्छा असेल की आयुष्यात चुका कमी व्हाव्यात, फसवणूक होऊ नये आणि निर्णयांवरील आत्मविश्वास वाढावा, तर चाणक्य नीतीमधील खालील ५ महत्वाचे सल्ले तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. खालील हे पाच सल्ले तुमचे विचार करण्याची पद्धतच बदलत नाही, तर आयुष्याची दिशाही सकारात्मक होऊ शकते.

योग्य निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला विचारा ‘हे’ ३ प्रश्न

कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काही क्षण थांबून विचार करणे फार गरजेचे आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणत्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न नक्की विचारले पाहिजेत:

१. मी हे काम का करत आहे?
२. याचा परिणाम काय होईल?
३. मी यात यशस्वी होऊ शकेन का?

उदाहरणाच सांगायचे तर, एखाद्या व्यक्तीने कोणतीही पूर्वतयारी न करता, केवळ इतरांचे पाहून नवीन व्यवसाय सुरू केला. पुढे जाऊन जेव्हा नुकसान होते, तेव्हा त्याला जाणीव होते की त्याने योग्य नियोजन केले नव्हते. जर सुरुवातीलाच या प्रश्नांवर विचार केला असता, तर परिस्थिती वेगळी असती. विचारपूर्वक घेतलेला निर्णय अनेकदा दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरतो.

१. महत्त्वाच्या सिक्रेट गोष्टी प्रत्येकाला सांगू नका

आजच्या सोशल मीडियाच्या युगात लोक आपली प्रत्येक सिक्रेट आणि यश लगेच शेअर करतात. परंतु, चाणक्य नीतिनुसार, आयुष्यातील मोठी ध्येये आणि महत्त्वाच्या योजना वेळेआधी जाहीर करू नयेत. अनेकदा लोक तुमच्या माहितीचा गैरफायदा घेतात किंवा तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत आपली रणनीती मर्यादित लोकांपर्यंतच ठेवणे शहाणपणाचे ठरते. यामुळे अनावश्यक स्पर्धा आणि फसवणुकीची शक्यता कमी होते.

२. चांगल्या लोकांची संगत

माणसाच्या विचारांवर आणि वर्तनावर त्याच्या आजूबाजूच्या लोकांचा खोल प्रभाव पडतो. चाणक्य नीतिनुसार, ज्या व्यक्ती समोर गोड बोलतात पण पाठीमागे नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांपासून दूर राहिले पाहिजे. उदाहरणार्थ, जर एखादा मित्र तुमच्या अपयशावर आनंदी होत असेल किंवा तुमच्या कमकुवतपणाची टवाळी करत असेल, तर असे नाते दीर्घकाळात नुकसान पोहोचवू शकते. याउलट, खरा मित्र तोच असतो जो चूक झाल्यास तुम्हाला समजावतो, कठीण काळात पाठीशी उभा राहतो आणि योग्य मार्ग दाखवतो.

३. भूतकाळावर नाही, वर्तमानावर लक्ष द्या

प्रत्येक माणसाकडून चुका होतात. परंतु, वारंवार त्याच चुकांची आठवण काढून दुःखी राहिल्याने वर्तमानही खराब होते. चाणक्य म्हणतात की, निघून गेलेला वेळ बदलता येत नाही; त्यामुळे त्यातून शिकून पुढे जाणे हाच समजूतदारपणा आहे. समजा, एखाद्या विद्यार्थ्याची एका परीक्षेत वाईट कामगिरी झाली, तर त्याने वर्षभर त्याच गोष्टीचा पश्चात्ताप करत राहिल्यास पुढच्या परीक्षेच्या तयारीवरही परिणाम होईल. याउलट, जर त्याने आपली चूक ओळखून मेहनत केली, तर पुढच्या वेळी उत्तम निकाल मिळू शकतो. वर्तमानात केलेले योग्य प्रयत्नच भविष्य मजबूत करतात.

४. शिक्षण कधीही थांबवू नका

चाणक्य नीतिनुसार, ज्ञान हे असे धन आहे जे कोणीही चोरू शकत नाही. बदलत्या काळासह नवीन गोष्टी शिकणे माणसाला अधिक समजूतदार आणि आत्मविश्वासी बनवते. आजच्या काळात नवीन तंत्रज्ञान, नवीन कौशल्ये (Skills) आणि बदलत्या कामाच्या पद्धती समजून घेणे पूर्वीपेक्षा जास्त गरजेचे झाले आहे. जी व्यक्ती सतत शिकत राहते, ती कठीण परिस्थितीतही उत्तम निर्णय घेऊ शकते. पुस्तके, अनुभवी व्यक्तींचा सल्ला आणि स्वतःचे अनुभव—हे तिन्ही आयुष्याचे महत्त्वाचे शिक्षक असतात.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)