Chanakya Niti for Career Success : करिअरमध्ये प्रगती करणे ही प्रत्येक नोकरदार व्यक्तीची इच्छा असते. मात्र, अनेकदा प्रचंड मेहनत करूनही अपेक्षित यश किंवा ओळख मिळत नाही. अशा परिस्थितीत आचार्य चाणक्य यांचे विचार आजही मार्गदर्शन करण्याचे काम करतात. चाणक्यांच्या मते, यश केवळ कठोर परिश्रमाने नाही, तर योग्य रणनीती, ज्ञान, शिस्त आणि संयमामुळे मिळते. जर तुम्हालाही तुमच्या कामाच्या ठिकाणी सर्वोत्तम कामगिरी करायची असेल, तर त्यांनी सांगितलेले खालील पाच सल्ले तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

१. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या

चाणक्यांच्या मते, कोणत्याही कामाची सुरुवात विचार केल्याशिवाय करू नये. एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याचा उद्देश, त्याचे संभाव्य परिणाम आणि स्वतःची तयारी यांचे मूल्यांकन करणे अत्यंत आवश्यक आहे. ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट स्वीकारताना, नोकरी बदलताना किंवा नवीन जबाबदारी घेण्यापूर्वी स्पष्ट नियोजन करणे अधिक चांगले परिणाम देते.

२. शिकणे कधीही थांबवू नका

आचार्य चाणक्य ज्ञानाला सर्वात मोठी संपत्ती मानत असत. काळानुरूप नवीन गोष्टी शिकणे आणि स्वतःचे कौशल्य (Skills) सातत्याने सुधारणे ही करिअरमध्ये पुढे जाण्याची सर्वात महत्त्वाची अट आहे. बदलणारे तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतीच्या या युगात जी व्यक्ती स्वतःला अपडेट ठेवते, तिच्यासाठी नवीन संधींचे दरवाजे नेहमी उघडे राहतात.

३. आपले प्लॅम वेळेपूर्वी कोणाशीही शेअर करू नका

चाणक्य नीतीनुसार, जोपर्यंत तुमचे ध्येय साध्य होत नाही, तोपर्यंत तुमची योजना जाहीर करणे टाळले पाहिजे. कामाच्या ठिकाणीही आपली प्रत्येक रणनीती किंवा भविष्यातील योजना सर्वांसमोर मांडण्याऐवजी, त्यावर शांतपणे काम करणे अधिक फायदेशीर ठरते. अनेकदा तुमचे काम आणि त्याचे परिणामच इतरांना चोख उत्तर देतात.

४. तुमच्या कामाने निर्माण करा ओळख

माणसाची खरी ओळख त्याच्या कामाने होते, असे चाणक्यांचे ठाम मत होते. तुमची सुरुवात कशीही झाली असली, तरी तुमची प्रामाणिकता, शिस्त आणि मेहनत तुम्हाला सन्मान मिळवून देऊ शकते. ऑफिसमध्येही लोकांचा विश्वास आणि आदर हा तुमच्या वर्तनाने आणि कामाच्या दर्जावरून ठरतो.

५. मानसिकदृष्ट्या सक्षम बना

कामाच्या दरम्यान ताणतणाव, आव्हाने आणि स्पर्धेचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो. अशा वेळी संयम राखणे, भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे हीच एका खऱ्या प्रोफेशनल्सची ओळख आहे. मानसिकदृष्ट्या मजबूत असलेली व्यक्ती कठीण परिस्थितीतही योग्य निर्णय घेऊन दीर्घकाळ यश टिकवून ठेवू शकते.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)