Making These 5 Mistakes at Work : घर असो वा काम; आचार्य चाणक्यांची शिकवण आजही प्रत्येक क्षेत्रासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यांनी लिहिलेल्या चाणक्य नीती या ग्रंथात यशाची अशी अनेक रहस्ये आहेत, जी आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या लक्षात आले असेल की, काही लोक खूप मेहनत करूनही आपल्या करिअरमध्ये चांगले स्थान मिळवू शकत नाहीत आणि आपल्या बॉसच्या नजरेत एक चांगला कर्मचारी बनू शकत नाहीत. तर त्यामागे एक मुख्य कारण असते आणि ते म्हणजे तुमचा आत्मविश्वास. त्याचबरोबर तुमच्या काही चुका प्रगतीत अडथळा आणू शकतात. त्याबाबत आचार्य चाणक्य काय सांगतात ते जाणून घेऊया…

प्रत्येकावर विश्वास ठेवणे

आचार्य चाणक्य सांगतात की, जी व्यक्ती विचार न करता, इतरांवर विश्वास ठेवते ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही. अशा व्यक्तीला सगळीकडे समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून बॉस त्याला चांगला कर्मचारी मानत नाही आणि त्याला पुढे जाऊ देत नाही. जर तुम्ही विचार न करता, कोणावर विश्वास ठेवला, तर त्यामुळे केवळ तुमचेच नाही, तर संपूर्ण कंपनीचे नुकसान होऊ शकते.

मेहनत लपवणे

कामाच्या ठिकाणी असे अनेक लोक असतात, जे खूप मेहनत करूनही यशस्वी होत नाहीत. त्याचे कारण असे की, ते आपली मेहनत दाखवून देऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या कामाचे श्रेय दुसराच कोणीतरी घेऊन जातो. अशी व्यक्ती बॉसचा आदर गमावून बसते आणि तिची प्रगती थांबते. आचार्य चाणक्य सांगतात की, प्रगती करण्यासाठी तुम्ही किती मेहनत घेतली आहे हे तुम्ही दाखवून देणे आवश्यक असते.

जास्त बोलणे आणि विनाकारण वाद घालणे

चाणक्य नीतीनुसार, जी व्यक्ती ऑफिसमध्ये विनाकारण बोलते आणि प्रत्येक मुद्द्यावर बॉसशी वाद घालते, तिच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात. बॉसच्या नजरेत अशा व्यक्तीबद्दल अनादराची भावना निर्माण होऊ शकते आणि त्याचा परिणाम हळूहळू तिच्या करिअरवर होऊ शकतो. अशा व्यक्तींना स्पष्टवक्ते नव्हे, तर उद्धट आणि वाद घालणारे मानले जाऊ शकते. त्यांच्या अशा वागणुकीमुळे नोकरीवरही परिणाम होण्याची शक्यता असते.

भावनांच्या आधारावर निर्णय घेणे

चाणक्याच्या तत्त्वांनुसार, जेव्हा एखादी व्यक्ती बॉससमोरसुद्धा भावनांच्या आधारावर निर्णय घेते. तेव्हा तिचे अनेक निर्णय चुकीचे ठरू शकतात, ज्यामुळे कंपनीचे नुकसान होते. त्यामुळे वेळीच ही सवय सोडून द्यावी.

आत्मविश्वासाची कमतरता

आचार्य चाणक्य यांच्या मते, कामाच्या ठिकाणी प्रगती करण्यासाठी आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. जर वरिष्ठांसमोर एखाद्या व्यक्तीमधील आत्मविश्वासाची कमतरता दिसत असेल, तर इच्छा असूनही तिच्या करिअरची प्रगती थांबू शकते.

तुमच्यातही अशा काही सवयी असतील किंवा कामाच्या ठिकाणी तुम्ही वारंवार अशा चुका करीत असाल, तर त्या वेळीच बदलण्याचा प्रयत्न करा.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)