Chanakya Niti Relationship : आचार्य चाणक्य यांना त्यांच्या काळातील सर्वांत ज्ञानी आणि विद्वान पुरुषांपैकी एक मानले जाते. ते केवळ एक महान शिक्षक आणि राजकारणीच नव्हते, तर त्यांना मानवी स्वभावाचीही खूप सखोल समज होती. शेकडो वर्षांपूर्वी चाणक्य यांनी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्या आजच्या काळातही आपल्यासाठी तितक्याच उपयुक्त ठरत आहेत. चाणक्य यांच्या या विचारांना आज आपण ‘चाणक्य नीती’ म्हणून ओळखतो. त्यांनी सांगितलेल्या विविध तत्त्वांपैकी काही गोष्टी आपल्या लव्ह लाईफशी (प्रेमसंबंधांशी)देखील जोडलेल्या आहेत.
आपणा सर्वांनाच वाटत असते की, आपली लव्ह लाईफ खूप छान असावी. जेव्हा आपल्याला एक चांगला लाईफ पार्टनर मिळतो, तेव्हा आयुष्य अगदी सेट झाल्यासारखे वाटते; परंतु जर त्याच्यात काही वाईट सवयी असतील, तर तेच आयुष्य अत्यंत कठीण आणि तणावपूर्ण बनू लागते. अनेकदा आपण प्रेमात आंधळे होऊन पार्टनरच्या काही चुकांकडे दुर्लक्ष करतो. कारण- पुढे जाऊन सर्व काही आपोआप ठीक होईल, असे आपल्याला वाटते; पण चाणक्य नीतीनुसार पार्टनरच्या काही चुका अशा असतात, ज्यांना कधीही हलक्यात घेऊन दुर्लक्ष करण्याची चूक करू नये.
जर तुम्ही वेळीच या चुका किंवा वाईट सवयींकडे लक्ष दिले नाही, तर तुमच्या नात्यात इतके अंतर निर्माण होईल की, शेवटी नाते तुटण्यापर्यंत वेळ येईल. पार्टनरच्या अशा कोणत्या चुका किंवा सवयी आहेत, ज्यांकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करता कामा नये, हे आपण या लेखात अगदी सोप्या शब्दांत जाणून घेणार आहोत.
१. सतत खोटे बोलण्याची सवय
आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणत्याही नात्याचा पाया विश्वासावरच टिकलेला असतो. जर तुमचा पार्टनर तुमच्याशी छोट्या छोट्या गोष्टींवरून खोटे बोलत असेल, तर हा एक रेड फ्लॅग म्हणजेच धोक्याचा इशारा आहे. चाणक्य यांच्या मते, जी व्यक्ती आपल्या जवळच्या माणसांशी खरे बोलू शकत नाही, ती कधीही प्रामाणिक राहू शकत नाही. सुरुवातीला तुम्हाला वाटू शकते की, तो वाद किंवा भांडण टाळण्यासाठी खोटे बोलत आहे; पण हळूहळू ही सवय तुमचा विश्वास पूर्णपणे तोडून टाकेल. विश्वासाशिवाय कोणतेही नाते दीर्घकाळ टिकू शकत नाही.
२. आदर न करणे किंवा कमी लेखणे
नात्यात प्रेमापेक्षाही अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांचा आदर करणे. जर तुमचा पार्टनर तुमचा आदर करत नसेल, सतत तुम्हाला कमी लेखत असेल किंवा मित्रांसमोर तुमची चेष्टा उडवत असेल, तर हे अत्यंत चुकीचे आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की, जिथे तुमचा आदर होत नाही, तिथून बाजूला होणेच योग्य ठरते. एक सच्चा पार्टनर नेहमी तुमचा आदर करेल; मग तुम्ही एकटे असो किंवा लोकांबरोबर. नात्यात आदरच नसेल, तर तिथे प्रेम कधीच टिकू शकत नाही.
३. अति राग आणि अहंकार
चाणक्य नीतीनुसार, राग हा कोणत्याही माणसाचा सर्वांत मोठा शत्रू असतो. जर तुमच्या पार्टनरला खूप लवकर आणि तीव्र राग येत असेल, तसेच रागाच्या भरात तो शिवीगाळ किंवा वाटेल ते बोलत असेल, तर हे नाते तुम्हाला फक्त त्रासच देईल. रागाच्या भरात माणूस अनेकदा अशा गोष्टी बोलून जातो, ज्या थेट मनाला लागतात. त्याशिवाय जर पार्टनरमध्ये खूप जास्त अहंकार असेल आणि तो नेहमी स्वतःलाच बरोबर सिद्ध करण्यात गुंतलेला असेल, तर अशा नात्यात तुम्हाला नेहमी घुसमटच जाणवेल.
४. फक्त स्वतःचाच विचार करणे
आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणतेही नाते तेव्हाच यशस्वी होते जेव्हा दोन्ही व्यक्ती समान प्रयत्न करतात. हे अगदी एका टीम वर्कसारखे असते; पण जर तुमचा पार्टनर फक्त स्वतःचाच विचार करीत असेल, त्याला फक्त स्वतःचा आनंद, स्वतःच्या गरजा आणि स्वतःच्या आवडी-निवडींचीच काळजी असेल, तर ही एक मोठी समस्या आहे. चाणक्य नीतीनुसार, एक स्वार्थी व्यक्ती कधीही खरे प्रेम करू शकत नाही. जर त्याला तुमच्या अडचणी आणि गरजांशी काहीही देणे-घेणे नसेल, तर समजा की, त्या नात्याचे ओझे तुम्ही एकटेच उचलत आहात. या सवयीकडे दुर्लक्ष केल्यास पुढे जाऊन तुम्हाला खूप मानसिक तणाव सहन करावा लागू शकतो.
५. महत्त्वाच्या गोष्टी लपवून ठेवणे
कोणत्याही नात्यात पारदर्शकता असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचा पार्टनर तुमच्यापासून त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी लपवत असेल, मग त्या पैशांशी संबंधित असोत, कुटुंबाबद्दल असोत किंवा त्याच्या भूतकाळाबद्दल असोत तर यांमुळे नाते आतून पोकळ होते. गोष्टी लपवण्याचा थेट अर्थ असा होतो की, त्याचा तुमच्यावर पूर्ण विश्वास नाही. जेव्हा या लपवलेल्या गोष्टी अचानक तुमच्यासमोर येतात, तेव्हा नात्यात असा भूकंप येतो की, सर्व काही विस्कटून जाते.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
