Having Money Is Not Enough : माणसाची खरी संपत्ती केवळ पैसा आणि सुखसोयींमध्ये नसते. एखाद्या व्यक्तीकडे फक्त पैसा आणि संपत्ती असून फायदा नाही तर त्याच्याकडे चांगली मूल्ये, ज्ञान, समाधान असे स्वभावगुणही असले पाहिजेत. चाणक्य नीतीच्या याच विचारावर आधारित, चला अशा पाच गोष्टी जाणून घेऊया, ज्यांचा अभाव माणसाला आतून गरीब बनवू शकतो.
चांगली मूल्ये
पैसा सुखसोयी देऊ शकतो. पण, चांगल्या वागणुकीमुळे आदर मिळतो. आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करणे आणि गरिबांना त्रास देणे यामुळे समाजात कधीही आदर मिळणार नाही. चाणक्य नीतीनुसार, माणसाच्या जीवनात चांगली मूल्ये आणि चांगले आचरण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या वागणुकीत अहंकार, गर्व आणि इतरांबद्दल अनादर असेल. तर केवळ संपत्ती त्याला महान बनवू शकत नाही. नम्रता, वडीलधाऱ्यांचा आदर, लहानांबद्दल स्नेह आणि गरजूंना मदत करणे यांसारखे गुणच माणसाला महान बनवतात. म्हणून, श्रीमंत असण्यासोबतच चांगली मूल्ये असणेही महत्त्वाचे आहे.
समाधान
आयुष्यात संपत्ती आवश्यक आहे. पण, जर संपत्तीचा लोभ कधीच संपत नसेल. तर तो माणसाची शांती हिरावून घेतो. चाणक्य नीतीमध्ये समाधानाला जीवनातील सर्वात महत्त्वाच्या सद्गुणांपैकी एक मानले जाते. जो माणूस सर्व काही असूनही, सतत स्वतःची तुलना इतरांच्या संपत्ती आणि सुखसोयींशी करतो, त्याला कधीच समाधान मिळत नाही. त्याच्या इच्छा सतत वाढत जातात आणि सतत अधिकाधिक पैसा कमावण्याच्या शर्यतीत तो स्वतःला गमावून बसतो. अशा परिस्थितीत, माणसाकडे पैसा असू शकतो. पण त्याला मनःशांती मिळत नाही. म्हणून, संपत्तीबरोबर आत्मसंयम आणि विवेक असणेही महत्त्वाचे आहे.
ज्ञान
पैसा कमावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्याचे व्यवस्थापन करणे आणि ते शहाणपणाने वापरणेही महत्त्वाचे आहे. चाणक्याच्या विचारांनुसार, ज्ञान आणि विवेक ही मोठी संपत्ती मानली जाते. जर एखाद्या व्यक्तीकडे भरपूर संपत्ती असेल, पण तिला तिचा योग्य वापर कसा करायचा हे माहित नसेल आणि ती चुकीचे निर्णय घेत असेल, तर ती आपली संपत्ती गमावू शकते. चुकीची गुंतवणूक, चुकीची संगत किंवा घाईने घेतलेले निर्णय आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरू शकतात. म्हणूनच, पक्के ज्ञान असलेली व्यक्ती सर्वात श्रीमंत मानली जाते.
भाषा
एखाद्या व्यक्तीची ओळख केवळ तिच्या कपड्यांवरून, पदावरून किंवा संपत्तीवरून ठरत नाही. तर तिची भाषा आणि वागणूक देखील तिचे व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप काही सांगून जाते. चाणक्य नीती मधुर वाणीच्या महत्त्वावर भर देते. जी व्यक्ती सतत इतरांचा अपमान करते, कठोर शब्दांचा वापर करते किंवा संपत्तीमुळे इतरांना कमी लेखते, ती हळूहळू आपल्या सभोवतालची माणसे गमावते. कोणीही तिच्याशी बोलू इच्छित नाही. कारण प्रत्येकासाठी आदरापेक्षा मोठी संपत्ती दुसरी कोणतीही नाही. म्हणूनच, असे म्हटले जाते की मधुर आणि आदरयुक्त भाषा नातेसंबंध आणखीन घट्ट करते.
त्याग
जर एखादी व्यक्ती संपत्ती मिळवल्यानंतर अहंकारी झाली आणि योग्य-अयोग्य यातील फरक विसरली, तर तिची संपत्ती आणि समृद्धी फार काळ टिकणार नाही. चाणक्य नीती सत्कर्मांना जीवनाचा एक महत्त्वाचा पाया मानते. गरजूंना मदत करणे, प्रामाणिकपणे कमाई करणे, इतरांच्या हक्कांचा आदर करणे, समाजाप्रती आपली जबाबदारी समजून घेणे, या गोष्टी माणसाचे जीवन अर्थपूर्ण बनवतात. म्हणूनच, पैसे कमावण्याबरोबरच आपले वर्तन, ज्ञान आणि मूल्ये सुधारणे हेदेखील महत्त्वाचे आहे.
