Chanakya Niti for Marriage: लग्न हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. त्यामुळे केवळ पहिल्या भेटीत एखादा पुरुष आवडणे, चांगली नोकरी असणे किंवा आकर्षक व्यक्तिमत्त्व असणे हेच जीवनसाथी निवडण्याचे एकमेव निकष असू शकत नाहीत. कोणत्याही माणसाचे खरे विचार आणि स्वभाव समजून घेण्यासाठी तो दैनंदिन जीवनात कसा वागतो, हे पाहणे अत्यावश्यक आहे. विशेषतः राग आल्यावर त्याची वागणूक, इतरांबद्दलचा आदर आणि जबाबदाऱ्यांबद्दलचे विचार याबद्दल त्यांनी बरेच काही सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांनीही जीवनसाथी निवडताना व्यक्तीचे गुण, आचरण आणि त्याचे चरित्र महत्त्वाचे मानले आहे. आजच्या नात्यांमधील परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे या गोष्टींकडे मार्गदर्शक म्हणून पाहिले पाहिजे आणि लग्नाचा निर्णय परस्पर समंजसपणा, संभाषण व वास्तविक व्यवहार पाहूनच घेतला पाहिजे.

१. ‘तो’ इतरांशी कसा वागतो?

एखाद्या व्यक्तीचे तुमच्याशी असणारे वर्तन पाहून, त्याच्या संपूर्ण स्वभावाचा अंदाज करणे कठीण असते. तो आपले आई-वडील, मित्र, सहकारी, दुकानदार किंवा इतर लोकांशी कसा बोलतो याकडे लक्ष द्या. तो समोरील व्यक्तीचे ऐकून घेतो का आणि त्या व्यक्तीच्या आदराची काळजी घेतो का? इतरांबद्दलचे त्याचे सामान्य वर्तन त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल महत्त्वाचे संकेत देत असते.

२. अडचण किंवा संकट आल्यावर ‘त्याचे’ वर्तन कसे असते?

परिस्थिती चांगली असताना शांत राहणे सोपे असते; परंतु ताणतणाव किंवा कठीण प्रसंगात माणसाचा खरा स्वभाव स्पष्ट दिसून येतो. समस्या आल्यावर तो त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो की लगेच राग, आरोप-प्रत्यारोप आणि भांडणावर उतरतो, हे नक्की पाहा. वैवाहिक आयुष्यात आव्हानांचा सामना एकत्र येऊन करावा लागतो. त्यामुळे संवाद आणि संयम हे गुण खूप महत्त्वाचे आहेत.

३. काम आणि जबाबदाऱ्यांबद्दलचा ‘त्याचा’ दृष्टिकोन

जीवनसाथी निवडताना फक्त त्याची सध्याची कमाई लक्षात घेणे एवढेच पुरेसे नाही, तर तो आपले काम आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांकडे किती गांभीर्याने पाहतो, हे समजून घेणेही गरजेचे आहे. तो भविष्यासाठी काही नियोजन करतो का? स्वतःच्या वाट्याची जबाबदारी पार पाडण्यापासून पळ तर काढत नाही ना? आर्थिक परिस्थिती वेळेनुसार बदलू शकते; पण जबाबदारीची जाणीव नात्यावर दीर्घकाळ परिणाम करते.

४. महिलांबद्दलचे ‘त्याचे’ विचार

लग्नाआधी हे जाणून घेणेही आवश्यक आहे की, तो महिलांचे मत आणि त्यांच्या स्वातंत्र्याला किती महत्त्व देतो. घरातील महिलांशी असणाऱ्या वर्तनाशिवाय तो तुमच्या आवडीनिवडी, निर्णय, करिअर आणि वैयक्तिक सीमांचा आदर करतो का हेदेखील पाहा. समानता आणि परस्पर आदर या गोष्टी चांगल्या नात्याची मजबूत पायाभरणी करतात.

५. राग आणि वाईट सवयींवर नियंत्रण (नकारात्मक बाबींतून दिसणारा ‘त्याचा’ चेहरा)

राग, खोटे बोलणे, जुगार, अतिमद्यपान किंवा इतर वाईट सवयी भविष्यात नात्यात तणाव निर्माण करू शकतात. त्यामुळे लग्नाआधी या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. जर एखादी व्यक्ती वारंवार अपमान करत असेल, धमकावण्याचा प्रयत्न करीत असेल किंवा आपल्या आक्रमक वर्तनाचे समर्थन करीत असेल, तर त्याकडे एक गंभीर स्वरूपाचे दुर्वर्तन म्हणून पाहणे महत्त्वाचे आहे.