Chanakya Niti For Men : आचार्य चाणक्य यांना त्यांच्या काळातील सर्वांत ज्ञानी आणि बुद्धिमान पुरुषांपैकी एक मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात यश, सुख आणि समृद्धी हवी असेल, तर त्याने चाणक्य यांचे विचार आपल्या आयुष्यात नक्कीच आत्मसात केले पाहिजेत, असे म्हटले जाते. चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही लोकांना योग्य आणि अयोग्य यांतील फरक समजून घेण्यास मदत करतात. त्यांच्या याच विचारांना आपण ‘चाणक्य नीती’ म्हणून ओळखतो. या नीतीमध्ये चाणक्य यांनी मैत्री, नातेसंबंध, वर्तन आणि विश्वास याविषयी अनेक मोलाचे सल्ले दिले आहेत.

आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात मित्र आणि जवळच्या लोकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. आपण ज्या लोकांबरोबर राहतो, ज्यांच्याशी आपल्या वैयक्तिक गोष्टी शेअर करतो आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा आपल्या आयुष्यावरही प्रभाव पडलेला असतो.पण, चाणक्य यांच्या मते प्रत्येकावर डोळे बंद करून विश्वास ठेवणे योग्य नाही. काही लोक असे असतात, जे समोरून तुमचे खूप जवळचे असल्याचा आव आणतात; पण संधी मिळताच तुमचे नुकसान करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. अशा लोकांना वेळेपूर्वीच ओळखणे खूप गरजेचे आहे.

जर तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की, नक्की हे लोक कोण आहेत? तर हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल. या लेखात आपण अशाच ५ प्रकारच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्यापासून पुरुषांनी थोडे सावध राहिले पाहिजे.

१. समोर गोड बोलणारे आणि पाठीमागे तुमची निंदा करणारे

काही लोकांची सवय अशी असते की, ते तुमच्यासमोर खूप गोड बोलतात, तुमचे कौतुक करतात आणि स्वतःला तुमचे सर्वांत जवळचे असल्याचे भासवतात. पण, तुम्ही तेथे नसताना ते तुमची निंदा करतात किंवा तुमच्या वैयक्तिक गोष्टी इतरांना सांगू लागतात. चाणक्य नीतीनुसार, अशा लोकांपासून नेहमी सावध राहावे. एखादी व्यक्ती तुमच्यासमोर वागणूक वेगळी आणि तुमच्या पाठीमागे पूर्णपणे वेगळीच भाषा वापरत असेल, तर अशा व्यक्तीवर चुकूनही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. अशा लोकांना तुमच्या वैयक्तिक गोष्टी सांगणे टाळा, कारण- तुम्ही त्यांना सांगितलेल्या ‘अशा’ गोष्टी पुढे जाऊन, तुमच्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात.

२. रागाच्या भरात तुमच्या वैयक्तिक गोष्टी इतरांना सांगणारे

कधी कधी आपण आपल्या एखाद्या मित्रावर किंवा जवळच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून, त्यांना आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. पण, प्रत्येक जवळची व्यक्ती ती गोष्ट स्वतःपुरतीच राखून ठेवील, असे नाही. काही लोक रागाच्या भरात किंवा एखाद्या गोष्टीमुळे तुमच्यावर नाराज होऊन, तुमची खासगी माहिती इतरांना सांगून टाकतात. चाणक्य नीतीनुसार, अशा लोकांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांच्या स्वभावाचा नीट अभ्यास केला पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीची छोट्या छोट्या गोष्टींवर रागावण्याची आणि इतरांसमोर गुपिते उघड करण्याची सवय असेल, तर अशा व्यक्तीसोबत कोणतीही महत्त्वाची गोष्ट शेआर न करणेच उत्तम ठरते.

३. प्रत्येक वेळी फक्त स्वतःचा फायदा पाहणारे लोक

काही लोक नातेसंबंध आणि मैत्री फक्त स्वार्थासाठी ठेवतात. जोपर्यंत त्यांना तुमच्याकडून कोणतेही काम असते, तोपर्यंत ते तुमच्याशी अत्यंत चांगल्या प्रकारे वागतात. तुमचे सर्व म्हणणे ऐकून घेतात आणि गरज भासल्यास तुमच्या खूप जवळ येण्याचाही प्रयत्न करतात; पण त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांचे वर्तन बदलते. चाणक्य नीतीनुसार, अशा स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहिले पाहिजे. एखादी व्यक्ती फक्त चांगल्या काळातच नाही, तर संकटाच्या काळातही तुमच्या पाठीशी उभी राहते की नाही, यावरून त्या माणसाची खरी ओळख पटते. जर एखादी व्यक्ती फक्त स्वतःच्या कामाच्या वेळीच तुम्हाला आठवत असेल, तर तिच्यावर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवणे योग्य नाही.

४. चुकीच्या संगतीत राहणाऱ्या लोकांपासून राहा सावध

आचार्य चाणक्य यांनी संगतीविषयीही अनेक महत्त्वाचे विचार मांडले आहेत. माणसाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा त्याच्या जीवनावर नक्कीच परिणाम होतो, असा त्यांचा विश्वास होता. जर एखादी व्यक्ती अशा लोकांसह राहत असेल, जे चुकीच्या गोष्टींना सामान्य मानतात किंवा तुम्हालाही प्रत्येक वेळी चुकीचे काम करण्यासाठी प्रवृत्त करतात, तर अशा व्यक्तीपासून अंतर ठेवून राहणेच फायद्याचे ठरते. सुरुवातीला अशा लोकांचे बोलणे तुम्हाला थट्टा किंवा साधे वाटू शकते; पण हळूहळू त्यांची संगती तुमच्या विचारसरणीवर आणि सवयींवर वाईट परिणाम करू शकते. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीला आपला जवळचा मित्र बनवण्यापूर्वी त्याची संगती आणि सवयी कशा आहेत, हे पाहणे अत्यंत गरजेचे असते.

५. तुमची कमजोरी जाणून घेऊन त्याचा फायदा घेणारे

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही अशा गोष्टी आणि कमजोरी असतात, ज्या त्या प्रत्येकाला सांगू शकत नाहीत. पण, जेव्हा आपण एखाद्यावर खूप जास्त विश्वास ठेवतो, तेव्हा आपण त्याला आपल्या अनेक खासगी गोष्टी सांगून बसतो. चाणक्य नीतीनुसार, आपली कमजोरी आणि महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीसमोर उघड करू नयेत. जर एखादी व्यक्ती तुमची कमजोरी जाणून घेतल्यानंतर वारंवार त्याच गोष्टीचा वापर तुम्हाला दाबण्यासाठी, घाबरवण्यासाठी किंवा स्वतःच्या मनाप्रमाणे चालवण्यासाठी करत असेल, तर अशा माणसापासून सावध राहण्याची गरज असते. अशा लोकांवर डोळे बंद करून विश्वास ठेवणे भविष्यात तुमच्यासाठी मोठे संकट ठरू शकते.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)