Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे त्यांच्या काळातील अत्यंत ज्ञानी आणि बुद्धिमान पुरुष म्हणून ओळखले जातात. ज्या लोकांना आयुष्यात यशस्वी आणि आनंदी राहायचे आहे, त्यांनी चाणक्य यांच्या विचारांचे पालन केले पाहिजे. आचार्य चाणक्य हे केवळ एक महान राजकीय सल्लागार आणि शिक्षक नव्हते, तर त्यांना मानवी स्वभावाचीदेखील सखोल ओळख होती. शतकांपूर्वी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजही आपल्याला योग्य मार्ग दाखवण्याचे काम करतात. चाणक्य यांच्या याच विचारांना आज आपण ‘चाणक्य नीती’ म्हणून ओळखतो.

आचार्य चाणक्य यांच्या मते, माणसाची बोली हीच त्याची सर्वांत मोठी ताकद आणि सर्वांत मोठी कमजोरी असते. योग्य वेळी बोलणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच योग्य वेळी शांत राहणेदेखील गरजेचे आहे. त्यांच्या मते, जी व्यक्ती न विचार करता प्रत्येक ठिकाणी आपले सल्ले देते, ती नेहमी स्वतःचेच नुकसान करून घेते. मात्र, एक समंजस व्यक्ती नेहमी परिस्थिती आणि वातावरण पाहूनच आपले विचार मांडते. आपण अशा काही ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे एका समंजस व्यक्तीने आपले मत मांडणे टाळले पाहिजे.

१. दोन व्यक्तींच्या आपापसातील वादात

आचार्य चाणक्य यांच्या मते, जेव्हा दोन लोक एकमेकांशी भांडत असतील किंवा वाद घालत असतील, तेव्हा तुम्ही मध्ये पडून तुमचे मत मांडू नये. अशा परिस्थितीत तुमचा चांगला हेतूही तुमच्याविरुद्ध जाऊ शकतो. चाणक्य सांगतात की, इतरांच्या वैयक्तिक बाबींमध्ये ढवळाढवळ केल्यास तुम्ही विनाकारण कोणाचे तरी शत्रू बनू शकता. जोपर्यंत दोन्ही व्यक्तींपैकी कोणी स्वतःहून तुमच्याकडे सल्ला मागत नाही, तोपर्यंत शांत राहणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.

२. जे लोक ऐकण्याच्या मानसिकतेत नसतील तिथे

चाणक्य नीतीनुसार, जिथे लोक कोणाचेही ऐकून घेण्याच्या तयारीत नसतात, तिथे ज्ञानाच्या गोष्टी सांगणे म्हणजे वेळ आणि ऊर्जा वाया घालवण्यासारखे आहे. चाणक्य म्हणतात की, जे लोक ऐकू इच्छित नाहीत किंवा तर्क समजून घेत नाहीत, त्यांना तुमच्या योग्य गोष्टीही चुकीच्या वाटतात आणि ते तुमच्याशीच वाद घालू लागतात. समंजस व्यक्ती अशा ठिकाणी शांत राहते आणि आपली ऊर्जा योग्य कामासाठी वापरते.

३. जिथे तुमच्या बोलण्याला आदर नसेल

जर तुम्हाला असे वाटत असेल की, समोरची व्यक्ती तुमच्या बोलण्याला महत्त्व देत नाही किंवा तुमचा अनादर करत आहे, तर तुम्ही लगेच शांत झाले पाहिजे. अशा ठिकाणी तुमचे मत मांडल्याने फक्त तुमचा स्वाभिमान कमी होतो. आचार्य चाणक्य यांच्या मते, तुम्हाला तुमच्या शब्दांची किंमत माहीत असली पाहिजे आणि तुमचे मत अशाच ठिकाणी मांडले पाहिजे, जिथे लोक ते ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तयार असतील.

४. ज्या विषयाची पूर्ण माहिती नसेल

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या विषयाबद्दल तुम्हाला अर्धवट किंवा अपुरी माहिती आहे, तिथे तुमचे मत मांडणे पूर्णपणे टाळले पाहिजे. अशा ठिकाणी मत मांडल्याने तुम्ही हास्यास्पद ठरू शकता. अपुरे ज्ञान हे नेहमी स्वतःसाठी धोकादायक ठरते. चाणक्य यांच्या मते, खरा समंजस व्यक्ती तोच आहे जो आपल्याला सर्वकाही माहीत नाही हे मान्य करतो. जिथे पूर्ण माहिती नसेल, तिथे बोलण्यापेक्षा शांत राहणे उत्तम. अशा ठिकाणी शांत राहून इतरांचे ऐकणे आणि नवीन गोष्टी शिकणे हाच शहाणपणा आहे.

५. दुसऱ्याच्या कौटुंबिक किंवा घरातील बाबींमध्ये

चाणक्य नीतीनुसार, तुम्ही दुसऱ्याच्या घरातील किंवा कौटुंबिक वादांमध्ये कधीही सल्ला देऊ नये. कौटुंबिक विषय अत्यंत संवेदनशील असतात. हे लक्षात ठेवले पाहिजे की, आज भांडणारे दोन लोक उद्या एकत्र येऊ शकतात. अशा वेळी तुम्ही दिलेल्या सल्ल्यामुळे ते दोघे नंतर एकत्र येऊन तुम्हालाच चुकीचे ठरवू शकतात, म्हणूनच इतरांच्या कौटुंबिक बाबींपासून नेहमी दूर राहिले पाहिजे.

६. जेव्हा वातावरणात खूप राग किंवा संताप असेल

आचार्य चाणक्य यांच्या मते, जेव्हा आजूबाजूचे लोक खूप रागात असतात, तेव्हा तुमचे कोणतेही समंजसपणाचे किंवा तार्किक बोलणे त्यांना समजणार नाही. माणूस रागात असतो तेव्हा त्याचे मन योग्य प्रकारे काम करत नाही. अशा वातावरणात मांडलेले मत परिस्थिती अधिक बिघडवू शकते. चाणक्य यांच्या मते, सर्वांचा राग शांत होईपर्यंत गप्प राहणे हाच योग्य निर्णय असतो.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)