Chanakya Niti On Ideal Son : चाणक्य नीतीला ज्ञानाचा सागर मानले जाते. याचे कारण असे की, आचार्य चाणक्यांनी लिहिलेल्या नीती ग्रंथामुळे आजही अनेक तरुणांना मार्गदर्शन मिळून यश मिळवण्यात मदत सुद्धा झाली आहे. त्यामुळे असंख्य तरुण आचार्य चाणक्यांना आपले गुरू आणि मार्गदर्शक मानतात आणि त्यांच्या धोरणांचे पालन करतात. आचार्य चाणक्यांनी निसर्गातील उदाहरणांद्वारे अनेक महत्त्वाचे गुण देखील स्पष्ट केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे सुके झाड…

चाणक्य नीतीमधून शिका जीवनाचे महत्त्वाचे धडे

१. एकेन शुष्कवृक्षेण दह्यमानेन वह्निना ।

दह्यते तद्वनं सर्वं कुपुत्रेण कुलं यथा ।।

चाणक्य नीतीमधील हा श्लोक स्पष्ट करतो की, ज्याप्रमाणे एका सुक्या झाडाला आग लागली तर त्या आगीमुळे संपूर्ण जंगल नष्ट होते. त्याचप्रमाणे, कुटुंबात कितीही सुशिक्षित मंडळी असली तरीही एकच वाईट वर्तन करणारा किंवा चुकीच्या मार्गावर गेलेला माणूस संपूर्ण कुटुंबाची प्रतिष्ठा आणि नाव खराब करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने सरळ मार्गावर चालावे आणि ज्ञान व सद्गुणांचा कधीही त्याग करू नये. अन्यथा, व्यक्तीला केवळ समाजातच नव्हे, तर देवाच्या चरणीही आश्रय मिळत नाही.

२. एकेनापि सुपुत्रेण विद्यायुक्ते च साधुना ।

आह्लादितं कुलं सर्वं यथा चन्द्रेण शर्वरी ।।

या श्लोकाद्वारे, आचार्य चाणक्य सांगतात की, ज्याप्रमाणे एक चंद्र पृथ्वीला प्रकाश देतो त्याचप्रमाणे एक सद्गुणी आणि विद्वान मुलगा कुटुंबाची प्रतिष्ठा उंचावर घेऊन जातो. म्हणून, मुलाने नेहमी आपल्या कुटुंबाची आणि समाजाची प्रतिष्ठा लक्षात घेऊनच कृती करावी आणि योग्य निर्णय घ्यावेत. जो व्यक्ती चांगली, प्रामाणिक आणि निष्कलंक (दोषरहित) कामे करतो, त्याच्या कर्तृत्वामुळे केवळ त्यालाच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुटुंबालाही मान-सन्मान आणि प्रसिद्धी मिळते.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)