How We Choose Between Good and Bad Behavior : प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात जे त्यांच्यावर नकळत प्रभाव टाकतात. आपला स्वभावच आपले यश व अपयश ठरवतो, असे लोकांना अनेकदा वाटते. पण, अनेकदा चांगल्या स्वभावाच्या लोकांनाही अडचणी व संकटांचा सामना करावा लागतो. आजच्या वेगवान जगात साध्या लोकांना जगणे खरं तर कठीण आहे. काही जण यश हिरावून घेतात, भोळ्या आणि साध्या लोकांना त्रास देतात. पण, महान विद्वान आचार्य चाणक्य यांनी अशा व्यक्तींसाठी काही विशेष सूचना दिल्या आहेत, ज्या त्यांना यश मिळवण्यास मदत करू शकतात.
चाणक्यांनी भोळ्या लोकांसाठी एक श्लोक लिहिला आहे, ज्याचे पालन करून ते यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतात…
अतिहि सरल नहिं होइये, देखहु जा बनमाहिं।
तरु सीधे छेदत तिनहिं, बांके तरु रहि जाहि।।
तुम्ही स्वभावाने सरळमार्गी असाल तर नेहमी सरळ राहू नका. कारण – कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकतो. वाईट माणसे सरळमार्गाने जाणाऱ्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतात. कधीकधी, यामुळे या सरळमार्गी लोकांना अपमान सहन करावा लागतो. म्हणूनच अशा लोकांना कमकुवत मानले जाते. त्यामुळे आचार्य चाणक्य असे मानतात की, अति सरळपणा हा देखील मूर्खपणाच्या श्रेणीत येतो. माणसाने थोडे हुशार असले पाहिजे. जेणेकरून तो जीवनात काहीतरी चांगले मिळवू शकेल. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे जंगलातील सरळ झाडे. जंगलातील सरळ झाडे तोडण्यासाठी सर्वात आधी निवडली जातात.
मानवी वर्तनात काही वाईट सवयींचाही समावेश असतो. त्यातील एक म्हणजे राग.
आचार्य चाणक्य रागाबद्दल म्हणतात की,
तुषना वैतरणी नदी, धरमराज सह रोष।
कामधेनु विद्या कहिय, नन्दन बन संतोष।।
या ओळींचा अर्थ असा होतो की, क्रोध हा यमराजासारखा विनाशकारी, इच्छा वैतरणी नदीसारख्या अंतहीन, विद्या कामधेनूसारखी सर्वकाही देणारी, तर समाधान नंदनवनासारखे सुखद असते. याचा अर्थ, मनुष्याच्या सर्व इच्छा कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणूनच इच्छांच्या मागे सतत धावण्याऐवजी ज्ञान मिळवण्यावर भर दिला पाहिजे.
चाणक्यांच्या मते, विद्या ही प्रत्येक परिस्थितीत योग्य मार्ग दाखवते, संकटांवर मात करण्याची ताकद देते आणि जीवनात यश, समृद्धी व सन्मान मिळवून देते. मात्र, केवळ संपत्ती किंवा ऐश्वर्य मिळवणे पुरेसे नसते. खरा आनंद आणि मानसिक शांतता समाधानातूनच मिळते. म्हणूनच त्यांनी समाधानाला नंदनवनाची उपमा देत, संतुलित आणि समाधानी जीवन जगण्याचा संदेश दिला.
