chanakya niti on sleeping : झोप हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आरोग्यासाठी दररोज ७ ते ८ तास झोप घेणे आवश्यक असते असे अनेक डॉक्टर आपल्याला सांगत असतात. पण, बऱ्याच लोकांना दिवसा झोपण्याची सवय असते. त्यामुळे आचार्य चाणक्यांनी ही सवय पूर्णपणे चुकीची असल्याचे घोषित केले आहे. चला तर मग, दिवसा झोपण्याचे तोटे आचार्य चाणक्य यांच्याकडून जाणून घेऊयात.

आचार्य चाणक्य भारतातील सर्वात ज्ञानी व्यक्तींपैकी एक मानले जातात. लोक आजही त्यांच्या नीती ग्रंथातील शिकवणींचे पालन करतात. चाणक्यांनी त्यांच्या नीती ग्रंथात आरोग्याच्या अनेक समस्यांवरही भाष्य केले आहे. तर आज आपण जाणून घेऊया की, आचार्य चाणक्यांनी दिवसा झोपणे ही एक वाईट सवय असल्याचे का म्हंटले आहे.

१. न दिवा स्वप्नं कुर्यात्
२. आयुः क्षयी दिवा निद्रा

या दोन श्लोकांमध्ये, आचार्य चाणक्यांनी दिवसा झोपणे एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी कसे हानिकारक ठरू शकते याबद्दल सांगितले आहे.

पहिल्या श्लोकाचा अर्थ

आचार्य चाणक्य सांगतात की, विनाकारण दिवसा झोप काढल्याने कामात अडथळे येऊन महत्वाचा वेळ वाया जाऊ शकतो. त्याचबरोबर पचनावरही परिणाम होतो, अपचन किंवा पोटाशी संबंधित त्रास वाढू शकतो. मात्र, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांसाठी दिवसा विश्रांती घेणे आवश्यक आणि योग्य मानले जाते.

दुसऱ्या श्लोकाचा अर्थ

या श्लोकात आचार्य चाणक्य सांगतात की, दिवसा जास्त वेळ झोपण्याची सवय आरोग्यासाठी चांगली मानली जात नाही. त्यांच्या मते, यामुळे शरीर आळशी होऊ शकते आणि आयुष्यावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. प्राचीन काळात अशीही मान्यता होती की, प्रत्येक व्यक्तीला ठराविक संख्येचे श्वास मिळालेले असतात. त्यामुळे दिवसा झोपणे टाळावे, असे चाणक्य सुचवतात.

आधुनिक वैद्यकीय विज्ञानानुसार, दिवसा थोडी (२० ते ३० मिनिटांची) झोप काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे चाणक्यांचा हा विचार प्राचीन मान्यतेवर आधारित असल्याचे लक्षात घ्यावे.