Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत, बुद्धिमत्ता आणि योग्य निर्णयक्षमता जितकी महत्त्वाची आहे, तितकेच आपल्या आजूबाजूला कोणते लोक आहेत, हेही महत्त्वाचे असते. चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास कधी कधी मोठ्या अडचणीचे कारण ठरू शकतो. आचार्य चाणक्य हे महान राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नीतीमध्ये मानवी स्वभाव, नाती, पैसा, व्यवहार आणि जीवनातील विविध प्रसंगांबाबत अनेक महत्त्वाचे विचार सांगितले आहेत. चाणक्यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीशी जवळीक ठेवणे योग्य नसते. काही लोकांपासून योग्य अंतर राखणे हाच शहाणपणाचा मार्ग असतो.
विशेष म्हणजे, एखादी व्यक्ती तुमच्यासमोर कितीही गोड बोलत असली तरी तिचे मन तुमच्यासाठी चांगलेच असेल असे नाही. त्यामुळे केवळ गोड बोलण्यावर विश्वास न ठेवता व्यक्तीची कृती आणि स्वभाव ओळखणे गरजेचे आहे.
१. दुष्ट स्वभावाचे मित्र
मित्र म्हणजे संकटात साथ देणारी व्यक्ती, अशी आपली सामान्य समजूत असते. मात्र प्रत्येक मित्र खरा मित्र असेलच असे नाही. चाणक्यनीतीनुसार, जो मित्र सतत तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतो, तुमच्या यशाचा मत्सर करतो किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचा वापर करतो, अशा व्यक्तीपासून अंतर ठेवणे योग्य ठरते. अशा व्यक्तीशी मैत्री कितीही जुनी असली तरी त्याचा विचार करणे गरजेचे आहे. कारण संकटाच्या वेळी खरी व्यक्ती कोण आणि दिखाऊ मित्र कोण, हे स्पष्ट होते.
२. गोड बोलणारे पण कपटी लोक
काही लोक समोर इतके गोड बोलतात की त्यांच्यावर लगेच विश्वास बसतो. सतत कौतुक करणे, तुमच्या प्रत्येक गोष्टीला होकार देणे आणि तुमच्याशी अतिशय‘ जवळीक दाखवणे हे त्यांचे वैशिष्ट्य असू शकते. मात्र त्यांच्या मनात तुमच्याबद्दल मत्सर किंवा वाईट भावना असतील तर हीच व्यक्ती योग्य संधी मिळताच तुमचे नुकसान करू शकते. खरा मित्र केवळ तुमची स्तुती करत नाही, तर तुमच्या चुका देखील स्पष्टपणे सांगतो. त्यामुळे फक्त गोड बोलणाऱ्यापेक्षा तुमचे हित सांगणाऱ्या व्यक्तीला महत्त्व द्या.
३. मूर्ख किंवा अज्ञानी व्यक्ती
चाणक्यांच्या विचारांनुसार, अशा व्यक्तीपासून सावध राहणे आवश्यक आहे जी परिस्थिती समजून न घेता निर्णय घेते किंवा परिणामांचा विचार न करता वागते. अशा व्यक्तीला एखादी महत्त्वाची किंवा गोपनीय माहिती सांगितल्यास ती व्यक्ती नकळत ती इतरांसमोर सांगू शकते. त्यामुळे गोपनीय बाबी कोणासोबत शेअर करायच्या, याबाबत नेहमी सावध राहणे गरजेचे आहे.
४. गर्विष्ठ आणि रागीट स्वभावाचे लोक
रागाच्या भरात माणूस अनेकदा असे निर्णय घेतो ज्याचा नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. त्यात गर्वाची भर पडली तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. अतिशय रागीट किंवा अहंकारी व्यक्ती छोट्या गोष्टींचे मोठ्या वादात रूपांतर करू शकते. अशा व्यक्तीसमोर आपली महत्त्वाची माहिती, योजना किंवा वैयक्तिक बाबी शेअर करताना सावध राहणे योग्य आहे. रागावर नियंत्रण नसलेल्या व्यक्तीशी वाद घालण्यापेक्षा योग्य अंतर ठेवणे अधिक शहाणपणाचे ठरू शकते.
५. स्वार्थासाठी नाती जोडणारे लोक
काही व्यक्ती तुमच्याशी केवळ तेव्हाच जवळीक ठेवतात जेव्हा त्यांना तुमच्याकडून काही फायदा मिळत असतो. काम असेल तेव्हा फोन, गरज असेल तेव्हा कौतुक आणि फायदा संपला की अचानक अंतर अशा वागणुकीतून स्वार्थीपणा दिसून येतो. अशा व्यक्तींवर आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांसाठी किंवा गोपनीय गोष्टींसाठी अवलंबून राहणे टाळावे. नात्याची खरी परीक्षा सुखात नाही, तर गरजेच्या वेळी कोण तुमच्यासोबत उभे राहते यात असते.
‘गोड बोलणं’ आणि ‘चांगलं असणं’ यात फरक आहे
चाणक्यनीतीचा हा विचार आजच्या काळातही महत्त्वाचा ठरतो. प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती वाईट असते असे नाही आणि प्रत्येक कठोरपणे सत्य सांगणारी व्यक्ती चांगलीच असेल असेही नाही. म्हणूनच व्यक्तीचे बोलणे नव्हे, तर त्याची कृती, स्वभाव आणि तुमच्याशी असलेली वागणूक पाहणे महत्त्वाचे आहे. आयुष्यात पुढे जायचे असेल तर योग्य लोकांची साथ मिळणे जितके आवश्यक आहे, तितकेच चुकीच्या लोकांपासून योग्य वेळी अंतर राखणेही गरजेचे आहे.
