Chanakya Niti Whom to Trust & Be Cautious: आचार्य चाणक्य यांना राजकारण, कूटनीती आणि जीवनव्यवस्थापनाचे महान गुरू मानले जाते. त्यांनी सांगितलेली चाणक्य नीती आजही लोकांना योग्य मार्ग दाखवते. विशेष म्हणजे त्यांनी मानवी नातेसंबंधांबाबत दिलेला एक महत्त्वाचा इशारा आजच्या काळातही तितकाच लागू पडतो. अनेकदा आपल्याला वाटते की सर्वात मोठा धोका समोर दिसणाऱ्या शत्रूपासून असतो. मात्र, चाणक्य यांचे मत यापेक्षा वेगळे होते.
चाणक्यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने विश्वास ठेवावा, पण तो डोळे झाकून ठेवू नये. कारण आंधळा विश्वास हा अनेकदा माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाचे कारण ठरू शकतो. विश्वास माणसाला नाती जोडण्याची ताकद देतो, पण चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास आयुष्यभराची फसवणूकही करून जाऊ शकतो.
आजच्या धावपळीच्या जगात अनेक नाती वरून गोड आणि घट्ट दिसतात, मात्र प्रत्येक हसरा चेहरा प्रामाणिक असेलच असे नाही; त्यामुळे कोणत्याही व्यक्तीची पारख करताना केवळ तिच्या गोड बोलण्यावर विसंबून राहू नये असे चाणक्य सांगतात.
विशेष म्हणजे चाणक्यांनी एका अशा धोक्याबाबत इशारा दिला होता, ज्याकडे बहुतांश लोक दुर्लक्ष करतात. त्यांच्या मते, समोर उभा असलेला शत्रू तितका धोकादायक नसतो; कारण त्याची ओळख आपल्याला असते. तो उघडपणे विरोध करतो आणि त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवता येते. पण, मित्राच्या रूपात जवळ राहणारी आणि मनात वेगळाच हेतू ठेवणारी व्यक्ती अधिक घातक ठरू शकते.
अशा व्यक्तीची ओळख करणे कठीण असते. ती वरून आपुलकी दाखवते, मदतीचा आव आणते, पण योग्य संधी मिळताच विश्वासघात करू शकते; त्यामुळे चाणक्यांनी प्रत्येकाला आपल्या नात्यांची वेळोवेळी पारख करण्याचा सल्ला दिला आहे.
चाणक्य असेही म्हणतात की, एखाद्या व्यक्तीची खरी ओळख तिच्या शब्दांत नसते तर तिच्या कृतीत असते. गोड बोलणे सोपे असते, पण संकटाच्या काळात कोण तुमच्या पाठीशी उभे राहते, यावरूनच त्या व्यक्तीचा खरा स्वभाव समजतो. कठीण प्रसंगी साथ सोडणारी व्यक्ती कितीही जवळची वाटत असली तरी तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे योग्य नसते.
आजच्या काळात नोकरी, व्यवसाय, आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक नातेसंबंध यामध्ये फसवणुकीच्या घटना वाढताना दिसतात. अशा परिस्थितीत चाणक्यांचा हा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका, पण प्रत्येकावर संशयही घेऊ नका. विवेक, सावधगिरी आणि योग्य निर्णय यांचा समतोल राखणे गरजेचे आहे.
हजारो वर्षांपूर्वी सांगितलेले चाणक्यांचे हे विचार आजही तितकेच प्रभावी वाटतात. त्यांचा संदेश स्पष्ट आहे—विश्वास ठेवा, पण विचारपूर्वक. कारण आयुष्यातील सर्वात मोठा धोका अनेकदा समोरच्या शत्रूकडून नव्हे, तर आपल्या जवळच्या व्यक्तीकडूनही होऊ शकतो.
